‘प्रवक्त्याचे वटमुखत्यारपत्र जाहीरसभेत चालते, संसदेत नाही’; खासदार संजय मंडलिक यांची सतेज पाटील यांना कोपरखळी

निवडून आलेल्या खासदारालाच लोकसभेमध्ये बोलावे लागते. प्रवक्त्याचे वटमुखत्यारपत्र जाहीरसभेत चालते, संसदेत चालत नाही, अशी कोपरखळी महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता मारली.

  गारगोटी : निवडून आलेल्या खासदारालाच लोकसभेमध्ये बोलावे लागते. प्रवक्त्याचे वटमुखत्यारपत्र जाहीरसभेत चालते, संसदेत चालत नाही, अशी कोपरखळी महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता मारली.

  भुदरगड तालुक्यातील वाघापूर, गंगापूरसह अनेक गावातील वाड्या-वस्त्यांमध्ये प्रचारसभेमध्ये ते बोलत होते. त्यांच्यासमवेत राहुल देसाई, प्रा. अर्जुन अबिटकर, पंडितराव केणे, कल्याणराव निकम, नाथाजी पाटील, राजेखान जमादार, दत्ता उगले, नंदकुमार ढेंगे, संग्राम सावंत, प्रकाश कांबळे यांच्यासह भुदरगड तालुक्यातील अनेक प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते.

  संजय मंडलिक म्हणाले, “संसदेत आजअखेर झालेल्या १०६ घटनादुरुस्त्यांमध्ये काँग्रेसने ७३ तर मोदी सरकारने केवळ ६ घटनादुरुस्त्या केल्या आहेत. त्यामुळे संविधानाला खरा धोका काँग्रेसपासूनच आहे. जगावर कोसळलेल्या कोरोनाच्या संकटाला संधी समजून जगातील ५३ गरीब देशांना मोदींनी लस पुरवली. त्यामुळे जगभर भारतीयांचे रेड कार्पेटने स्वागत होते. आता देशाचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक असून, देशाला स्थैर्य आणून देण्यासाठी व देश बलवान करण्यासाठी या लोकसभा निवडणुकीला महत्त्व आहे.

  गेल्या ७५ वर्षांच्या स्वातंत्र्योत्तर कालावधीत देशाची विकसनशील वाटचाल काही बदलली नव्हती. रोटी, कपडा और मकानच्या पुढे विषय काही सरकला नव्हता. नरेंद्र मोदी यांनी मात्र गेल्या दहा वर्षात ८० कोटी लोकांना मोफत धान्य योजना राबवली. पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या तब्बल १६०० च्या वर क्रांतिकारक निर्णयांनी देशाला आर्थिक, सामाजिक स्थैर्य आणून दिले आहे.”

  संजय मंडलिक निष्ठावंतच…

  संजय मंडलिकांनी पक्ष बदलल्याचा कांगावा करणाऱ्यांचा समाचार घेताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, खासदार संजय मंडलिक हे निष्ठावंतच आहेत. त्यांनी २०१४ , २०१९ या दोन्ही लोकसभा धनुष्यबाण चिन्हावर लढवल्या. आता २०२४ मध्ये तिसऱ्यांदाही ते धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणूक लढवत आहेत. तीनही वेळा पक्ष तोच, चिन्ह तेच. त्यामुळे विरोधकांच्या कांगाव्यात दम नाही?