संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

संगीत क्षेत्रात महाराष्ट्र स्तरावर सर्वाधिक पसंतीची ठरलेली सृजन भजन स्पर्धा यंदा अखिल भारतीय पातळीवर जाहीर करण्यात आली आहे. बारामतीमधील शारदानगर येथे ७ ऑगस्ट रोजी या स्पर्धेची अंतिम फेरी होणार असून, महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील ७ राज्यांतील गायकांसाठी ही स्पर्धा पर्वणी ठरणार आहे.

  बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : संगीत क्षेत्रात महाराष्ट्र स्तरावर सर्वाधिक पसंतीची ठरलेली सृजन भजन स्पर्धा यंदा अखिल भारतीय पातळीवर जाहीर करण्यात आली आहे. बारामतीमधील शारदानगर येथे ७ ऑगस्ट रोजी या स्पर्धेची अंतिम फेरी होणार असून, महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील ७ राज्यांतील गायकांसाठी ही स्पर्धा पर्वणी ठरणार आहे.

  आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून पाच वर्षांपूर्वी सृजन भजन स्पर्धा जिल्हा स्तरावर सुरू झाली. त्यानंतर पुणे, सातारा, नगर या विभागीय पातळीवर तिचे आयोजन करण्यात आले. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता दोन वर्षांपासून ही स्पर्धा राज्यस्तरावर घेण्यात आली. त्यालाही भरभरून प्रतिसाद मिळाला. गेल्यावर्षी संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई यांच्या संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवाचे औचित्य साधून आयोजित स्पर्धेत १२०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यंदाही त्या सोहळ्याच्या उत्तरार्धाच्या काळाचे औचित्य आहे.

  यंदा या स्पर्धेचा आणखी विस्तार करण्यात आला असून, दक्षिण भारत हा स्वतंत्र विभाग यंदा करण्यात आला आहे. त्यामुळे देशात प्रथमच अशा स्वरूपातील भजन स्पर्धा होत असून, गायकांसाठी ही मोठी पर्वणी आहे. महाराष्ट्र, दक्षिण भारत अशा दोन प्रमुख विभागांबरोबर कर्जत-जामखेड या मतदारसंघासाठी स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दोन फेऱ्या ऑनलाइन असतील. अंतिम फेरी प्रत्यक्ष सादरीकरणाची होणार आहे. आतापर्यंत झालेल्या स्पर्धा या जगातील सर्वात मोठ्या भजन स्पर्धा ठरल्या आहेत. या माध्यमातून प्रामाणिकपणे अध्यात्मिक वारसा टिकावा, यासाठी आमदार रोहित पवारांचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

  …अशी असेल महाराष्ट्रसाठीची स्पर्धा

  महाराष्ट्र पातळीवरील स्पर्धेसाठी आठ विभाग करण्यात आले असून, त्यामध्ये पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, कोकण, मुंबई यांचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाला ७५ हजार, द्वितीय ५१ हजार तर तृतीय क्रमाकांला ४१ हजारांचे पारितोषिक या शिवाय अंतिम फेरीत विजेते तीन क्रमांक वगळून उर्वरित २१ संघांना प्रत्येकी ११ हजार रुपये उत्तेजनार्थ पारितोषिक तसेच दुसऱ्या फेरीसाठी निवड झालेल्या विभागनिहाय २५ संघांना १ हजार रुपयांचे बक्षिस ठेवण्यात आले आहे.

  …अशी असेल दक्षिण भारत स्पर्धा

  यंदा प्रथमच होणाऱ्या दक्षिण भारत विभागात प्रामुख्याने कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, गोवा या राज्यांतील गायकांचा सहभाग असेल. या विभागातील प्रथम क्रमांकाला ५१ हजारांचे, द्वितीय क्रमांकाला ४१ हजार तर तृतीय क्रमांकाला ३१ हजारांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या विभागात गायकांना मराठी, हिंदी भक्तिगीते सादर करता येणार आहेत.

  कर्जत-जामखेड विभाग स्पर्धा

  कर्जत-जामखेड मतदारसंघातील गायकांसाठी स्वतंत्र विभाग करण्यात आला असून, प्रथम क्रमांकाला १५ हजार, द्वितीय १० हजार तर तृतीय क्रमांकाला ५ हजारांचे पारितोषिक सोबतच अंतिम फेरीतील विजेते तीन क्रमांक वगळून इतर सात संघांना प्रत्येकी २ हजार उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे.