एसटी- क्रेन अपघातात 12 प्रवासी जखमी; पुणे- नगर महामार्गावरील घटना

सणसवाडी (ता. शिरुर) नजीक पुणे -नगर महामार्गावर कल्याणी चौक येथे एसटी बस व क्रेनचा भीषण अपघात होऊन झालेल्या अपघातात तब्बल बारा प्रवाशी जखमी झाले. जखमींवर कोरेगाव भीमा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शिक्रापूर : सणसवाडी (ता. शिरुर) नजीक पुणे -नगर महामार्गावर कल्याणी चौक येथे एसटी बस व क्रेनचा भीषण अपघात होऊन झालेल्या अपघातात तब्बल बारा प्रवाशी जखमी झाले. जखमींवर कोरेगाव भीमा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सणसवाडी येथील पुणे -नगर महामार्गावरुन एसटी बस अहमदनगर बाजूने पुणे बाजूकडे जात असताना कल्याणी चौकातून एसटीच्या पुढे जाणाऱ्या क्रेन चालकाने अचानक क्रेन रस्त्यावरुन अचानकपणे उजव्या बाजूकडे वळविली. दरम्यान अहमदनगर बाजूकडून आलेल्या एसटीची क्रेनला धडक बसली. या अपघातात बसमधील 12 प्रवासी जखमी झालेत.

    घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पोलीस हवालदार राजेश माने, पोलीस नाईक राकेश मळेकर, महेंद्र पाटील, पोलीस मित्र खंडेराव चकोर, बापू भांडवलकर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने कोरेगाव भीमा येथील खासगी रुग्णालयात हलवले.

    अपघातात सारिका अजित फुले (रा. सुस रोड, पुणे), सुमन सुर्यकांत भोसले व जयंत सुर्यकांत भोसले (दोघे रा. कात्रज, पुणे), राहुल दत्तात्रय काफे (रा. कोपरगाव, अहमदनगर), अरमान अमरफारु खान (रा. शिरुर), निर्मला शिवाजी हापसे व शिवाजी देवराव हापसे (दोघे रा. राहुरी, अहमदनगर), अश्विनी विशाल आवारे व विशाल सखाराम आवारे (दोघे रा. निंबूडी, अहमदनगर), शोभा भारत हिवाळे (रा. नाशिक), वीरेंद्र दिनकर बनसोडे (रा. वाटेगाव), शिवाजी अनिल दाभाडे (रा. शिरुर) हे सर्व बारा प्रवाशी जखमी झाले.

    या बाबत एसटी चालक विरेद्र दिनकर बनसोडे (वय 47, रा. वाडेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली. पोलिसांनी सुरजकुमार अशोक कुमार (रा. आजमगड, उत्तरप्रदेश) याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने व पोलीस नाईक राकेश मळेकर हे करत आहे.