दारूच्या नशेत फोडली महामंडळाची एसटी बस, बस फोडणाऱ्या तरुणाला अटक; संगमवाडी ब्रिजवरील घटना

दारूच्या नशेत तरुणाने धावत्या एसटी बसवर दगडफेक करून काच फोडली. बस थांबविल्यानंतर त्याने आत शिरून खिटक्यांची तोडफोड केली. रहिवाशांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धक्काबुक्की करत धमकावल्याचा प्रकार घडला.

    पुणे : दारूच्या नशेत तरुणाने धावत्या एसटी बसवर दगडफेक करून काच फोडली. बस थांबविल्यानंतर त्याने आत शिरून खिटक्यांची तोडफोड केली. रहिवाशांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धक्काबुक्की करत धमकावल्याचा प्रकार घडला.

    संगमवाडी ब्रिज येथे रात्री पावणे आकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. जयपालसिंग जापणसिंग जुन्नी (वय १९, रा. पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळानिर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. याबाबत बाळासाहेब वारे (वय ४३, रा. बीड) यांनी तक्रार दिली आहे.

    तक्रारदार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक आहेत. ते रात्री पावणे आकराच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील बीड जिल्ह्यातील एसटी बस घेऊन जात होते. त्यावेळी बस संगमवाडीकडे जाणाऱ्या ब्रिजवर आल्यानंतर अचानक एकाने बसच्या समोरील काच दगड फेकून फोडली. त्यामुळे त्यांनी बस थांबवली. बस थांबल्यानंतर दारूच्या नशेतील जयपालसिंग बसमध्ये शिरला व त्याने खिडकीच्या देखील काचा फोडण्यास सुरूवात केली. त्याला नागरिकांनी विचारपूस करत अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धमकावत त्याने गोंधळ घातला. पुढील तपास पोलीस करत आहेत.