जास्त वेळ गाडी थांबवली म्हणून प्रवाशाकडून एसटी चालकाची धुलाई; नातेपुतेच्या ढाब्यावरील घटना

कोरोना महामारी संपल्यानंतर एसटी रुळावर येत असतानाच पुणे-पंढरपूर रस्त्यावरील नातेपुते येथील ढाब्यावर जेवणासाठी थांबलेल्या गाडीवरून वाद झाला. या वादादरम्यान संतप्त प्रवाशाने एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. 

    माळशिरस : कोरोना महामारी संपल्यानंतर एसटी रुळावर येत असतानाच पुणे-पंढरपूर रस्त्यावरील नातेपुते येथील ढाब्यावर जेवणासाठी थांबलेल्या गाडीवरून वाद झाला. या वादादरम्यान संतप्त प्रवाशाने एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली.

    मंगळवेढा आगाराची स्वारगेट-पंढरपूर गाडी रात्री ८ वाजता नातेपुते येथील धाब्यावर जेवणासाठी उभी राहिली होती. यावेळी गाडी १० मिनिटे थांबेल, असे वाहकाने सांगितले. त्यानंतर गाडीतील प्रवासी ज्ञानेश्वर उराडे यांनी १० मिनिटे झाली असून, गाडी कधी सुटणार? अशी विचारणा चालक इनामदार यांना विचारणा  केली. यावरून वाद वाढत जाऊन उराडे यांनी चालकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली, अशी फिर्याद चालक इनामदार यांनी नातेपुते पोलिसात दिली.

    दरम्यान, याप्रकरणी प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल केला असून, याचा तपास सुरू आहे. लवकरच संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

    धाब्यावर अनेक वेळा होतात वाद

    सर्व आगाराच्या बस या ठिकाणी नाष्टा, चहा, जेवणासाठी नेहमीच थांबतात. मात्र, वेळेवरून प्रवासी व चालक-वाहकांमधील वाद अनेकवेळा घडत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने याबाबत लक्ष घालून ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता प्रवाशांमधून व्यक्त केली जात आहे.