पुणे-बेंगलोर महामार्गावर एसटी घुसली नाल्यात, सुदैवाने प्रवासी बचावले; २ तास ट्रॅफिक जाम

इस्लामपूर आगाराच्या एसटी बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने रस्त्याकडेच्या नाल्यात जाऊन बस घुसली. या अपघातात एसटीतील ५० प्रवासी सुदैवाने बचावले. मात्र एसटीचं मोठं नुकसान झाले.

    कराड : इस्लामपूर आगाराच्या एसटी बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने रस्त्याकडेच्या नाल्यात जाऊन बस घुसली. या अपघातात एसटीतील ५० प्रवासी सुदैवाने बचावले. मात्र एसटीचं मोठं नुकसान झाले. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराडनजिक मलकापूर शहराच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लोटस फर्निचरच्या समोर ही घटना घडली.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामपूर आगाराच्या एसटी बसच्या स्टेरिंगचा अचानक रॉड तुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याकडेच्या नाल्यातील खड्ड्यात जाऊन एसटी अपघातग्रस्त झाली. या बसमधून पन्नास प्रवासी प्रवास करत होते. मात्र सुदैवाने त्यामधील कोणीही गंभीर जखमी झाले नाही.

    क्रेनच्या साह्याने डीपी जैन कंपनीचे पीआरओ दस्तगीर आगा, जगन्नाथ थोरात, वाहतूक पोलीस कर्मचारी काटरे तसेच कंपनीचे ट्राफिक मार्शल यांनी सहकार्य करून अपघातग्रस्त एसटीचा अडथळा दूर केला. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली, मात्र तोपर्यंत लोटस फर्निचरपासून ते पाटण ते तिकाटणेपर्यंत आणि पाचवड फाट्यापर्यंत वाहनांच्या सुमारे दोन तास रांगा लागल्या होत्या. वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. प्रवासी व वाहनधारकांचीही मोठी गैरसोय झाली.