मराठ्यांच्या पोरांच्या पाठीशी उभं रहा, नाहीतर…; मनोज जरांगेंचा मराठा नेत्यांना इशारा

मराठा नेत्यांनी मराठ्यांच्या पोरांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. नाहीतर आम्हाला शांततेत का होईना पूर्वीच्या भूमिकेवर यावेच लागणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

    छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. आता ते अधिक आक्रमक झाल्याचं दिसतं आहे. ओबीसींनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याला विरोध केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं आहे. तर मराठा नेत्यांना त्यांनी आवाहन केलंय. तसंच गंभीर इशाराही दिलाय. मराठ्यांच्या पोरांवर खोटेनाटे डाव टाकले जात आहेत. केसेस दाखल केल्या जात आहेत. मराठा नेत्यांनी मराठ्यांच्या पोरांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. नाहीतर आम्हाला शांततेत का होईना पूर्वीच्या भूमिकेवर यावेच लागणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

    …तर मराठा समाज माफ करणार नाही

    जरांगे पुढे बोलताना म्हणाले, ओबीसींचे काही नेते मराठा समाजाला टार्गेट करत आहे. मराठा नेत्यांना आवाहन आहे की, त्यांनी आता समाजाच्या पाठी उभे राहा. जात संपू देऊ नका. जात संपली की तुम्ही संपलात म्हणून समजा. तुमच्या पाठीमागे जात आहे म्हणून मराठा नेत्यांना किंमत आहे. मराठा समाजाच्या पाठी उभे राहण्याची ही खरी वेळ आहे. मराठ्यांना न्याय मिळवून देण्याची हीच वेळ आहे. यावेळी तुम्ही नाही आलात तर मराठा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

    आमचं शांततेचं आंदोलन मोडण्याचं काम ओबीसी नेत्यांकडून सुरु आहे. त्यांना वठणीवर आणण्याची ताकद मराठा नेत्यांमध्ये आहे. मात्र त्यांना करायचं नसेल तर आम्ही खंबीर आहोत, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.