जे लोक काम करतात त्यांच्या पाठीशी रहा! आमदार वैभव नाईक यांचे हुमरमळावासियांना आवाहन

गावातील शाळेला तब्बल २५ लाखांचा निधी देण्यात आला. त्यामुळे हुमरमळावासियानी जे लोक काम करतात त्यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.

    जे लोक काम करतात त्यांच्या पाठीशी रहा, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी शनिवारी कुडाळ तालुक्यातील हुमरमळा ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त केले. हुमरमळा ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याला आमदार वैभव नाईक यांची मुख्य उपस्थिती होती.

    यावेळी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून हुमरमळावासियांना आवाहन करताना स्पष्ट केले की, येणाऱ्या ५ वर्षात सुद्धा हुमरमळा गावात विकासकामे करायची राहणार नाहीत. अतुल बंगे मागील २५ वर्षे येथे सक्रिय होते. त्यांनी ही ग्रामपंचायत बिनविरोध केली. मात्र, यावर्षी प्रथमच विरोधक सामने आले. पण, यातही सुद्धा विरोधकांना सत्ता काबीज करता आली नाही. आताचे नवे सरपंच अमृत देसाई यांनी गावावर लक्ष द्यावे. मागील ९ वर्षात खासदार आणि आमदार निधीतून सर्वाधिक निधी देण्यात आला आहे. या गावातील शाळेला तब्बल २५ लाखांचा निधी देण्यात आला. त्यामुळे हुमरमळावासियानी जे लोक काम करतात त्यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.

    उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुख्य पदाधिकारी तथा हुमरमळा गावचे माजी सरपंच अतुल बंगे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणूक झाल्यावर आज प्रथमच हुमरमळा गावात एक सोहळा होत आहे. या ग्रामपंचायत इमारतीसाठी १६ लाखांचा निधी देण्यात आला आहे. खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी या गावच्या विकासासाठी भरीव निधी दिला आहे. २८ वर्षांनी विरोधकांची सीट या हुमरमळा ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकून आली. केवळ अप्रचार करून त्यांना जिंकता आले आहे. विरोधकांनी केवळ जातीय राजकारण केले. आज गावात बॅनर किती लागले तरी येथील ग्रामस्थांना माहिती आहे की, आमदार वैभव नाईक यांचे या गावात काम आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये विनायक राऊत आणि वैभव नाईक यांचा विजय निश्चित आहे.

    यावेळी सरपंच अमृत देसाई यांनी विश्वास व्यक्त केला की, विकासाच्या जोरावर आणि नागरिकांच्या पाठिंब्यावर खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक हे पुन्हा जिंकून येतील. यावेळी कुडाळचे गटविकास अधिकारी धनंजय जगताप, सरपंच अमृत देसाई, उप सरपंच रश्मी वालावलकर, माजी सरपंच अर्चना बंगे, जिल्हाप्रमुख संजय पडते, उप जिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका संघटक बबन बोभाटे, हेमांगी कद्रेकर, रमेश परब, मितेश वालावलकर आदी उपस्थित होते.