रुबी हॉल ते रामवाडी मार्गावरील मेट्रो तातडीने सुरू करा, अन्यथा… ; आमदार रवींद्र धंगेकर यांचा इशारा

रुबी हॉल ते रामवाडी मार्गावर मेट्रो सुरू करण्याबाबत मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांनी दोन आठवड्यांपूर्वीच हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता अधिक दिरंगाई न करता या मार्गावरील मेट्रो तातडीने सुरू करा. अन्यथा, आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला.

    पुणे : रुबी हॉल ते रामवाडी मार्गावर मेट्रो सुरू करण्याबाबत मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांनी दोन आठवड्यांपूर्वीच हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता अधिक दिरंगाई न करता या मार्गावरील मेट्रो तातडीने सुरू करा. अन्यथा, आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला.

    महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांना काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्र पाठवून रुबी हॉल ते रामवाडी मार्गावर मेट्रो तातडीने सुरू करण्याची मागणी केली. मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवलेला असताना आपण लाल कंदील का दाखवला आहे? निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही दिरंगाई केली जात आहे का? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

    आमदार धंगेकर म्हणाले, पुण्यात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणेकरांना दररोज तासनतास रस्त्यावर थांबावे लागत आहे. यावर उपाय म्हणून असे नवीन प्रकल्प पुण्यात सुरू आहेत. किमान याचे भान ठेवून तातडीने हा प्रकल्प कार्यान्वित करावा. हा प्रकल्प सर्वसामान्य जनतेच्या पैशातून निर्माण झाला आहे. केवळ उद्घाटन झाले नाही म्हणून हा प्रकल्प बंद ठेवणे म्हणजे हे पुणेकरांची सत्वपरीक्षा पाहण्यासारखे आहे.’

    वेगळा पायंडा पाडता येईल

    हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर पंतप्रधानांचा जेंव्हा अधिकृत वेळ आपल्याला मिळेल त्यावेळी याचे लोकार्पण करावे. पण आधी मेट्रो सुरू करून पुणेकरांना सुविधा द्यावी. यामुळे ‘आधी सुविधा, नंतर उद्घाटन’ हा एक वेगळा पायंडा आपल्याला पाडता येईल, अशी टिपण्णी ही त्यांनी यावेळी केली.