विघ्नहर्त्याच्या उत्सवावर कोरोनाचे विघ्न,राज्य सरकारने जाहीर केली नियमावली – मूर्तीच्या उंचीसह इतर नियम जाणून घ्या

राज्य सरकारने कोविड-१८ च्या संदर्भात विघ्नहर्त्याच्या उत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे(Guidelines For Ganeshotsav) जाहीर केली आहेत. त्यामुळे विघ्नहर्त्याच्या उत्सवावर(Restrictions On Ganeshotsav) यावर्षी देखील निर्बंधाचे विघ्न कायम राहिल्याचे चित्र आहे.

  मुंबई : देशभरात कोविड-१९ चे(Covid -19) विघ्न काही टळताना दिसत नाही. त्यातच साऱ्या मराठी मुलखात आणि विशेषत: मुंबईत धुमधडाक्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोविड-१८ च्या संदर्भात विघ्नहर्त्याच्या उत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे(Guidelines For Ganeshotsav) जाहीर केली आहेत. त्यामुळे विघ्नहर्त्याच्या उत्सवावर(Restrictions On Ganeshotsav) यावर्षी देखील निर्बंधाचे विघ्न कायम राहिल्याचे चित्र आहे.

  मूर्तीच्या उंचीचं काय ?
  या मार्गदर्शक नियमांमध्ये प्रामुख्याने सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी ४ फूट तर घरगुती गणेशमूर्तीसाठी २ फुटांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यापूर्वी गणेश मुर्तीकार संघटनेच्या रेश्मा खातू यांनी यासंदर्भात मूर्तीकारांची बाजू मांडताना गणेशोत्सवाला अवघे दोन महिने उरलेले असताना कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना अद्याप राज्य सरकारकडून न दिल्याची तक्रार केली होती. मात्र यंदातरी गणेशमूर्तीच्या उंचीबाबत मर्यादा राज्य सरकारने घालू नये, अशी मागणी मूर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी केली होती. गेल्यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करताना ४ फुटापर्यंत गणेशमूर्तीची उंची असावी, अशा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, यंदा अशी मूर्तींच्या उंचीबाबत मर्यादा घालू नये, अशी अपेक्षा केली जात होती.

  निर्देशांचे काटेकोर पालन करण्याची हमी द्यावी
  गृहविभागाच्या आदेशानुसार गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे आवश्यक असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे कमीत कमी गर्दी जमविण्याबाबत निर्देशांचे काटेकोर पालन करण्याची हमी द्यावी लागणार आहे. तसेच कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा.

  सांस्कृतिक ऐवजी आरोग्य उपक्रम राबवावेत
  सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूट असावी.  विसर्जन कृञिम तलावात करावे, शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी. नागरिक देतील ती वर्गणी स्विकारावी. शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी. सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत. आरती, भजन, किर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी. नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे. गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी अश्या मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.