राज्यातील दुष्काळाकडे राज्य सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; शरद पवारांचा आरोप

राज्यातील दुष्काळाकडे राज्य सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे प्रसंगी रस्त्यावर उतरून आम्हाला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असा थेट  इशारा शरद पवार यांनी दिला आहे

    सातारा : सातारा जिल्ह्यासह राज्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना चारा उपलब्धता माणसाच्या हाताला काम आणि पाण्याची उपलब्धता या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे मात्र ऐन लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीमध्ये राज्यातील दुष्काळाकडे राज्य सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे प्रसंगी रस्त्यावर उतरून आम्हाला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असा थेट  इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे

    सातारा लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याच्या दृष्टीने पवार शुक्रवारी साताऱ्यात दाखल झाले . पुणे बेंगलोर महामार्गावरील येथील एका हॉटेलच्या दालनामध्ये हा मेळावा रंगला यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, कराडचे आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे ,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीचे सहा मतदार संघातील सदस्य यावेळी उपस्थित होते पवारांनी यावेळी इंडिया आघाडीच्या सदस्यांची बैठकी घेतली तत्पूर्वी पत्रकारांशी संवाद साधला

    यावेळी बोलताना पवार म्हणाले, “राज्यामध्ये पावसाचे अनुशेषामुळे दुष्काळाची परिस्थिती आहे सध्या माणसांच्या हाताला काम दुष्काळग्रस्त भागांमध्ये चाऱ्याची सोय आणि पाण्याचे उपलब्धता या घटकांची गरज आहे . राज्यात 13 मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश आहे तत्कालीन दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता . कृषिमंत्री असताना फळबागांच्या अनुदानासंदर्भातही आम्ही धोरणात्मक भूमिका घेतली होती मात्र राज्यातील दुष्काळाच्या संदर्भात कोणतेही ठोस निर्णय लोकसभेच्या राजकीय रणधुमाळीमुळे होताना दिसत नाहीत. राज्य सरकारचे राज्यातील दुष्काळाकडे दुर्लक्ष झाले आहे या संदर्भात योग्य उपाय योजना झाल्या नाही तर राष्ट्रवादी म्हणून आम्हाला प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल,” असा इशारा शरद पवार यांनी दिला.

    सातारा लोकसभेसाठी कोणता उमेदवार असणार या प्रश्नावर मात्र पवारांनी राजकीय चतुरता दाखवली. शरद पवार म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठका सुरू आहेत त्यामुळे आत्ताच उमेदवार जाहीर करणे योग्य नाही सहा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भूमिका आम्ही समजावून घेतल्या आहेत या चर्चेमधून आमदार शशिकांत शिंदे आमदार बाळासाहेब पाटील जिल्हाध्यक्ष सुनील माने सत्यजित पाटणकर अशी काही नावे समोर आलेली आहेत त्यामुळे पार्लमेंटरी बोर्ड तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच उमेदवार निश्चित केला जाईल,” असे पवार म्हणाले. महायुतीकडून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव निश्चित झाल्यास साताऱ्याची जागा त्यांना देणार का तेव्हा पवारांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. ते म्हणाले “ही जागा राष्ट्रवादीची आहे त्यामुळे उमेदवार हा राष्ट्रवादीचाच असणार,” त्यांनी असे ठामपणे स्पष्ट केले .