
राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांतील परिचारिका, कक्षसेवक, सफाई कामगार सहभागी होणार आहेत. त्यामुळे आरोग्यसेवा देखील ठप्प होणार असून, रुग्णांचे हाल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांबाबत एक महत्त्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी आक्रमक झाले असून, मंगळवारपासून (14 मार्च) पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यामुळं या संपाचा फटाक सर्व क्षेत्रातील कामांवर होणार आहे. तसेच राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांतील परिचारिका, कक्षसेवक, सफाई कामगार सहभागी होणार आहेत. त्यामुळे आरोग्यसेवा देखील ठप्प होणार असून, रुग्णांचे हाल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच आरोग्यसेवेवर मोठा परिणाम होणार असून, रुग्णांसाठी तरी सेवा सुरु ठेवावी असं बोललं जात आहे.
संपाचा परिणाम आरोग्य सेवेवर…
या संपामध्ये रुग्णालयातील परिचारिका, कक्षसेवक, सफाई कामगार सहभागी होणार आहेत. जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याच्या मागणीवर राज्य सरकारी कर्मचारी संघटना ठाम असून, नियोजित संप कोणत्याही परिस्थितीत यशस्वी केला जाईल, असा विश्वास कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना तात्काळ लागू करावी, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना तातडीने सेवेत कायम करावे, सर्व रिक्त पदे लवकरात लवकर भरावी, यासह अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघाने हा संप पुकारला आहे.
…तर संप मागे नाही
जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप चालूच ठेवणार असं राज्य कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. संप मागे घेऊन यशस्वी तोडगा काढण्यासाठी सरकारकडे दोन दिवसांची मुदत दिली आहे. कर्मचारी संघटनांची सोमवारी राज्य सरकारबरोबर बैठक होणार आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही. मुंबईतील राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेले जे. जे. रुग्णालय, सेंट जॉर्जेस रुग्णालय, जी. टी. रुग्णालय आणि कामा रुग्णालयातील सर्व तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत.