
सातारा पालिकेच्या माध्यमातून गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी शासनाकडून ४ कोटी ८५ लाखांचा निधी पालिकेला मंजूर झाला आहे. या तळ्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य-दिव्य पुतळा उभारला जाणार असून, पालिका निविदा प्रसिद्ध करून नियोजित स्मारकाचे संकल्पचित्र मागवून घेणार आहे.
सातारा : सातारा पालिकेच्या माध्यमातून गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी शासनाकडून ४ कोटी ८५ लाखांचा निधी पालिकेला मंजूर झाला आहे. या तळ्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य-दिव्य पुतळा उभारला जाणार असून, पालिका निविदा प्रसिद्ध करून नियोजित स्मारकाचे संकल्पचित्र मागवून घेणार आहे.
सातारा शहराचे पूर्वेकडील प्रवेशद्वार म्हणून गोडोलीची ओळख आहे. येथील गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या ‘अमृत २’ या योजनेंतर्गत ४ कोटी ८३ लाखांचा निधीही पालिकेला प्राप्त झाला आहे. सध्या सुशोभीकरणाची कामे गतीने सुरू असून, या तळ्यात छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानी छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत स्मारकाचा आराखडा, संकल्पचित्र यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच नियोजित स्मारकाच्या अनुषंगाने गोडोली तळ्याची पाहणीदेखील करण्यात आली.
सातारा पालिकेकडून गोडोली तळ्यातील गाळ व पाणी काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तलावाच्या बाजूने कम्पाउंड वॉलचे कामही प्रगतिपथावर आहे. यानंतर गोल बैठक व्यवस्था, फ्लावर बेड, गार्डन पॅसेज, लँडस्केप पिचिंग, खेळणी, ट्रॅक, ओपन जीम, ॲम्पीथिएटर, पार्किंग व्यवस्था, प्रेक्षा गॅलरी, कांरजा अशी कामे टप्प्याटप्प्याने केली जाणार आहेत.
मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम गतीने सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर हे तळे शहराच्या सौंदर्यात निश्चितच भर घालणार आहे. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभे राहणार असून, त्या दृष्टीने प्रशासनाची कार्यवाही सुरू झाली आहे.
- दिलीप चिद्रे, नगर अभियंता