ड्रायव्हरच्या हाती स्टेअरिंग तर एक्सिलेटर कंडक्टरकडे, गाड्या नादुरुस्तीचा प्रवाशांना मोठा फटका

कवठेमहांकाळ एसटी आगाराचा (Kavathe Mahankal Bus Stand) सावळागोंधळ काही संपता संपत नाही. अधिकारी बदलले पण समस्या आहे त्याच. गाड्या वेळेवर लागत नाहीत आणि लागल्याच तर त्याला ड्रायव्हर, कंडक्टर वेळेवर भेटत नाही.

    कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ एसटी आगाराचा (Kavathe Mahankal Bus Stand) सावळागोंधळ काही संपता संपत नाही. अधिकारी बदलले पण समस्या आहे त्याच. गाड्या वेळेवर लागत नाहीत आणि लागल्याच तर त्याला ड्रायव्हर, कंडक्टर वेळेवर भेटत नाही. गाड्यांच्या वेळापत्रकांचे तर नेहमीच ‘तीन तेरा’ हे ठरलेलेच. त्यातच कवठेमहांकाळ आगारात नादुरुस्त गाड्यांचा मोठा भरणा आहे.

    ढकल स्टार्ट त्या कधी बंद पडतील, तेही सांगता येत नाही. गाड्या कधीच वेळेवर सोडल्या जात नाहीत. त्याला कमी गाड्यांच्या संख्येचीही मोठी पुष्टी मिळत आहे. त्यातच प्रशासनाकडून केवळ लांब पल्ल्याच्या गाड्यांना पसंती दिली जात असल्याने स्थानिक प्रवाशांना त्याच जबर फटका बसत आहे. त्यातच गुरुवारी सायंकाळी पाऊणे सहाची कवठेमहांकाळ-घाटनांद्रे मार्गावरील एसटी बसचा जाताना एक्सिलेटर कुची-जाखापुर दरम्यान अचानक निसटला.

    प्रवासांची गैरसोय नको म्हणून निष्णात असणारे चालक एम. ए. पाटील यांनी एक्सिलेटर नादुरुस्त असतानाही मिळेल त्या दोरीने एक्सिलेटर बांधून ती दोरी महिला वाहक पी. व्ही. देसाई यांच्या हाती दिली व त्यांना ती ऑक्सिलेटर बांधलेली दोरी योग्यवेळी कमी जास्त ओढण्यास सांगितली. त्यांच्या मदतीने जाता सुमारे वीस व येता वीस किमी असे 40 किमीचे अंतर पार करत बस सुरक्षित नेऊन प्रवाशांना आश्चर्याचा धक्का दिला.