कांदा पिकवायचा बंद करतो, गांजा पिकवायची परवानगी द्या; सदाभाऊ खोत यांचा सरकारला घरचा आहेर

केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क वाढवल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, याबाबत आपली भमिका स्पष्ट करताना माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी संताप व्यक्त करत, कांदा पिकवायचा बंद करतो, गांजा पिकवायची परवानगी द्या, अशी मागणी केली आहे.

    सांगली : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क वाढवल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, याबाबत आपली भमिका स्पष्ट करताना माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी संताप व्यक्त करत, कांदा पिकवायचा बंद करतो, गांजा पिकवायची परवानगी द्या, अशी मागणी केली आहे. तसेच ” शेतकऱ्यांना काही देणे जमत नसेल तर नका देऊ, पण किमान शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवू नका ” असा घरचा आहेर खोत यांनी दिला आहे.

    यावेळी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, लाल कांदा मातीमोल किंमतीने विकला गेला, म्हणून सरकारनेच प्रति किलो साडे तीन रुपयांचे अनुदान दिले. त्यामुळे शेकऱ्यांना थोडाफार चांगला दर मिळू लागला होता, आता केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क वाढवले आहे.

    शेतकऱ्यांनी शेती करायची किंवा नाही ?, जर शेतकऱ्यांचा माल सर्वानाच फुकट खायचा असेल तर सरकारने शेतकऱ्यांची शेती ताब्यात घ्यावी, आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मंत्रालयातील क्लार्क इतका पगार द्यावा, जेणे करून तोही त्याचे कुटुंब सन्मानाने उभा करू शकले, असे सरकारने एकदा धोरण तयार करावे.” असे आवाहन त्यांनी केले.

    असे धोरण जमणार नसेल तर शेतकऱ्यांना गांजा आणि अफू लावण्यास परवानगी द्या, आम्ही शेतकरी कांदा, अन्नधान्य, भाज्या पिकवण्याचे बंद करतो. कांद्याचा भाव वाढल्यावर कांदा खाऊ नका, कांदा न खाल्याने कोणाचा मृत्यू झालाय का ?, शेती माल जरा महाग झाला की सगळीकडून ओरड सुरू होते आणि सरकार त्याला तात्काळ प्रतिसाद देते, आमच्या रयत क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही निवेदन देणार आहोत. याबाबत आम्ही नाशिक जिल्ह्यापासून आंदोलन उभा करणार असल्याचे सांगत, त्यांनी सरकरला जर शेतकऱ्यांना काही देणे जमणार नसेल तर नका देऊ पण त्याच्या अन्नात माती कालवू नका असा घरचा आहेर, माजी मंत्री खोत यांनी दिला आहे.