पक्षाचं काम थांबव, नाहीतर… BRS नेत्याला निनावी पत्राद्वारे धमकी; बीडमध्ये खळबळ

'बीआरएस पक्षाचे काम थांबव, अन्यथा तुझा दाभोलकर करू', अशी धमकी बीडच्या गेवराई येथील माजी जिल्हा परिषद सभापतीचे पती तथा बीआरएसचे नेते बाळासाहेब मस्के आणि त्यांच्या पत्नी मयुरी मस्के यांना देण्यात आली आहे.

    बीआरएस पक्षाच्या नेत्यासह त्यांच्या पत्नीला गोळ्या झाडून हत्या करण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. निनावी पत्राद्वारे, ‘बीआरएस पक्षाचे काम थांबव, अन्यथा तुझा दाभोलकर करू’, अशी धमकी बीडच्या गेवराई येथील माजी जिल्हा परिषद सभापतीचे पती तथा बीआरएसचे नेते बाळासाहेब मस्के आणि त्यांच्या पत्नी मयुरी मस्के यांना देण्यात आली आहे.

    तुम्ही दोघे नवरा – बायको गेवराई तालुक्यात शिबीर घेऊन आमच्या नेत्यांचे खच्चीकरण करत आहात. त्यामुळे बीआरएसचे काम थांबव, अन्यथा गोळ्या घालून दाभोलकर करु, अशी धमकी बाळासाहेब मस्के व पत्नी मयुरी खेडकर – मस्के यांना निनावी पत्राद्वारे देण्यात आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

    या पत्रात अत्यंत खालची भाषा वापरून खोट्या केसेसमध्ये अडकवून तुरुंगात टाकण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. याप्रकरणी बाळासाहेब मस्के यांनी माझ्यासह माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या जिवीतास धोका असल्याची तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पत्रात नेमकं काय म्हटलं?

    निनावी पत्रात बाळासाहेब मस्के यांना खालच्या पातळीवरील भाषा वापरत संदेश लिहिला आहे. ‘तू बीआरएस पक्षात जाऊन जास्त माजलास का, तुला जास्त झालय का, तू गावोगाव शिबीर घेऊन आमच्या नेत्यांचं खच्चीकरण करत आहे. त्यामुळे तू करत असलेलं राजकारण बंद कर, अन्यथा आमच्या नेत्याचा आदेश आल्यावर तुला गोळ्या घालून तुझा दाभोलकर करु’, अशी धमकी देऊन अत्यंत खालची भाषा वापरली आहे. ही तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.