राज्यात होळीला पावसासह ‘तुफान’ वारा; आज ‘धुळी’वंदनात पावसाचा अंदाज

सोमवारी होळीचा सण साजरा होत असताना, आणि होलिका दहन करण्याच्या दिवशी मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, कल्याण डोबिंबली आणि आसपासच्या परिसरात तुफान वारा वाहत होता. या वाऱ्यामुळे प्रचंड वेगात झाडं सैरावैरा हलत आहेत. वाऱ्याचा वेग इतका आहे की झाडं पडतात की काय, असंच वाटतंय.

मुंबई- राज्यात (State) पश्चिमी विक्षोभामुळे आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या प्रभावाने अवकाळीची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कमाल तापमान ३८ अंशापुढे जात असताना ४ मार्चपासून वातावरण ढगाळ झाले आहे. सुरुवातीला केवळ उत्तर महाराष्ट्रापुरत्या असलेल्या अवकाळीच्या संकटाने निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे. महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे (Rain) ढग घोंगावत आहेत. दोन ते तीन दिवस उत्तर महारा‌ष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुढील २ दिवस मराठवाडा-विदर्भ (Marthawada and Vidharbha) भागांवर वादळी पावसाचे संकट आहे. ७ ते ८ मार्चला दोन्ही विभागांत विजेच्या कडकडासह गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सोमवारी मुंबईसह आसपास ‘तुफान’ वारा…

सोमवारी होळीचा सण साजरा होत असताना, आणि होलिका दहन करण्याच्या दिवशी मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, कल्याण डोबिंबली आणि आसपासच्या परिसरात तुफान वारा वाहत होता. या वाऱ्यामुळे प्रचंड वेगात झाडं सैरावैरा हलत आहेत. वाऱ्याचा वेग इतका आहे की झाडं पडतात की काय, असंच वाटतंय. रस्त्यावर झांडांच्या पानांचा खच पडलाय. तर काही ठिकाणी या सुस्साट वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्याही पडल्यात. तसेच पश्चिम उपनगरात विजेच्या खांबावर झाडांच्या फांद्या पडल्यामुळं काही काळ वीज खंडित झाली होती.

आज ‘धुळी’वंदनात पावसाचा अंदाज
दरम्यान, आज ढगाळ वातावरणासह राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच काहीत भागात सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. वसई-विरारमध्ये तर पाऊसही पडला. तर जळगाव, नाशिक, विदर्भ तसेच मराठवाड्यातील अनेक भागात सोमवारी पावसाने हजेरी लावली. मुंबईत मोजता येणार नाही इतक्या वेगाने वारे वाहत होते. वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे नागरिक हवालदील झाले आहेत. तसेच आजार बळावण्याची शक्यता देखील आहे.