पुणे जिल्ह्यात 3 वाहनांचा विचित्र अपघात; कारने पेट घेतला अन्…

पुणे- नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघातात झाला. अपघातात चारचाकी स्विफ्ट गाडीने पेट घेतल्याने गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. यात चारचाकीतील तिघांचा आगीमध्ये होरपळून जागीच मृत्यू झाला.

    पुणे : पुणे- नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघातात झाला. अपघातात चारचाकी स्विफ्ट गाडीने पेट घेतल्याने गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. यात चारचाकीतील तिघांचा आगीमध्ये होरपळून जागीच मृत्यू झाला. तर, चारचाकीमधील एक जण जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि. १७) सकाळी सहा वाजता मंचरजवळील ( ता. आंबेगाव) गोरक्षनाथखिंड, तांबडेमळा हद्दीत झाला.

    मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विफ्ट चारचाकीवरील चालक हा (एम एच १४ डी टी ०२९५) मंचर बाजूकडून पुणे बाजूकडे जात होता. तेव्हा आयशर टेम्पो (एम एच १२ क्यू जी ३३५१) याची धडक स्विप्ट गाडीला बसली. या अपघातात स्विफ्टमधील अंकुश उर्फ अनिकेत ज्ञानेश्वर भांबुरे (वय ३२), वीरेंद्र विजय कदम (दोघेही रा. खेड), रोहिदास लक्ष्मण राक्षे (रा. राक्षेवाडी ता. खेड) यांचा मृत्यू झाला आहे. तर, दत्तात्रय चंद्रकांत गोतारणे (वय ३२ रा. राजगुरूनगर ता. खेड) हा जखमी झाला आहे. महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणारा कंटेनर (जी जे ०१ डब्लु बी १७३७) हा बंद अवस्थेत उभा होता. दरम्यानच्या काळात पुण्याहून नाशिककडे जाणारा आयशर टेम्पो डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने आला व प्रथम स्विफ्ट गाडीला समोरून धडक दिली. त्यानंतर उभ्या कंटेनरला जाऊन धडकला.

    पोलिसांकडून शोध सुरू

    या अपघातात स्विफ्ट गाडीने पेट घेतल्याने ती जळून खाक झाली आहे. या चारचाकीतील तिघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, पोलीस हवालदार राजेंद्र हिले यांनी घटनास्थळी भेट दिली. या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. अपघाताला कोणते वाहन कारणीभूत ठरले याचा शोध मंचर पोलीस घेत आहेत.