धनगर आरक्षणासाठी म्हसवडमध्ये कडकडीत बंद; म्हसवडकरांनी उपोषणकर्त्यांना दिला पाठींबा

म्हसवड शहरामध्ये धनगर आरक्षणावरुन आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाला पाठींबा म्हणून धनगर समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला आहे.

    म्हसवड : आरक्षणाच्या (Dhangar reservation) मुद्द्यावरुन राज्यामध्ये ठिकठिकाणी पुन्हा एकदा आंदोलन सुरु झाले आहेत. धनगर समाज देखील आरक्षणासाठी (Reservation)आक्रमक भूमिका घेत आहे. म्हसवड (Mhaswad) शहरामध्ये धनगर आरक्षणावरुन आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाला पाठींबा म्हणून धनगर समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर माण तालुका (Man Taluka) बंदला म्हसवडकरांनी पाठींबा देत शहरात कडकडीत बंद पाळून उपोषणकर्त्यांना आपले समर्थन दर्शवले आहे.

    धनगर समाजाला एस.टी. आरक्षण घटनेने दिलेले असताना ते देण्यास सरकार आजवर टाळाटाळ करीत आले आहे असा आरोप या उपोषणकर्त्यांचा आहे. समाजाच्या हक्काचे असलेले आरक्षण मिळवण्यासाठी धनगर समाजाच्या उत्तम विरकर, प्रकाश हुलवान, व गणेश केसकर या तीन युवकांनी प्रजासत्ताक दिनापासून म्हसवड पालिकेसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या या उपोषणाला दररोज विविध संघटनांकडून पाठींबा दिला जात आहे, त्याचप्रमाणे विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनीही प्रत्यक्ष याठिकाणी भेट देत उपोषणकर्त्यांच्या पाठीशी आपण असल्याचे स्पष्टोक्ती दिली आहे.

    धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण छेडलेल्या या उपोषणाला 6 दिवस उलटुन अद्यापही शासनाने याची दखल घेतलेली नाही. यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धनगर समाजाने एकत्र येत 1 फेब्रुवारी रोजी माण तालुका बंद ची हाक दिली, त्याला म्हसवडकरांनी प्रतिसाद देत शहर कडकडीत बंद ठेवुन धनगर समाजाच्या उपोषणाला आपले समर्थन दिले. या बंद दरम्यान म्हसवड शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.