
जालना येथे सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर बेछूट लाठी हल्ला केल्याच्या निषेधार्थ तसेच या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने कोल्हापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
काळ्या िफती बांधून सरकारचा निषेध
दसरा चौक येथे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी राज्य सरकारवर टीका करण्यात आली. कार्यकर्त्यांनी डोक्याला काळ्या िफती बांधून सरकारचा निषेध केला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, शशिकांत पाटील, गणी आजरेकर, कादर मलबारी बाबा पार्टे बाबा इंदुलकर, बाबा देवकर, शारंगधर देशमुख, अर्जुन माने, मोहन सालपे, दिलीप देसाई, जयकुमार शिंदे, दिगंबर फराकटे, सुशील बांदिगिरे, विजय सावंत दुर्वास कदम संदीप देसाई आदींचा सहभाग होता.
जलद कृती दल दाखल
बंदमध्ये लक्ष्मीपुरी व्यापार पेठेतील व्यापाऱ्यांनी सहभाग घेतल्याने संपूर्ण बाजारपेठेत शांतता होती. तर कोल्हापुरातून कोकण, गोवा, कर्नाटकला जाणाऱ्या एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. सकाळपासून एक ही बस मध्यवर्ती बस स्थानकातून बाहेर पडली नाही. परिणामी ग्रामीण भागातील परिवहन यंत्रणा यामुळे कोलमडून पडली. शहरात येणाऱ्या सर्व प्रवेश दारावर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दसरा चौकात मोठा पोलीस बंद ठेवण्यात आला होता. जलद कृती दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या कोल्हापुरात दाखल झाल्या होत्या.