आरक्षणाच्या मागणीसाठी सातारा जिल्हा कडकडीत बंद ; ठिकठिकाणी साखळी उपोषणाची सत्रे,अत्याव्यश्यक सेवा सुरू, पोलिसांचा वाढता बंदोबस्त

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या धारदार लढाईला सातारा जिल्ह्यातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे .मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने सातारा जिल्हा बंदची हाक दिली होती.

    सातारा : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या धारदार लढाईला सातारा जिल्ह्यातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे .मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने सातारा जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंदला जिल्ह्यातून अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के प्रतिसाद मिळाला सातारा शहरासह वाई,फलटण, कराड, दहिवडी, वडूज, खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी, पाटण या वेगवेगळ्या ठिकाणी मराठा आंदोलकांनी उत्स्फूर्तपणे व्यवहार बंद ठेवले. या बंदमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला थोड्याफार प्रमाणात झळ बसली. शालेय विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्र परीक्षा सुरू असल्याने पालकांची मात्र असुविधा होऊन पळापळ झाली.

    सातारा व कराड वडूज व कोरेगाव या आगारातील एसटीच्या सेवांवर मात्र याचा परिणाम झाला. दहिवडी येथील विद्यार्थ्यांनी आरक्षण द्या तरच परीक्षा देऊ, अशी भूमिका घेत शाळेसमोरच जोरदार आंदोलन केले . मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातून आंदोलनाचा एल्गार सुरू झाला असून त्याची झलक मंगळवारी जिल्हा बंदच्या निमित्ताने पाहायला मिळाली. सातारा जिल्ह्यातील व्यावसायिकांनी दिवसभर आपले व्यवसाय बंद ठेवले होते . या बंदच्या आवाहनामुळे व्यापारी वर्तुळात दहा कोटींची उलाढाल ठप्प झाली. खंडाळा वाई फलटण कराड पाटण सातारा येथे तालुक्याच्या ठिकाणी मराठा आंदोलकांची साखळी उपोषण सत्रे सुरू आहेत . भजन ,कीर्तन, रॅली पदयात्रा एक दिवस समाजासाठी अशा विविध उपक्रमातून मराठा आरक्षणाचा लढा जिल्ह्यात सातत्याने सुरू असून सुमारे जिल्ह्यातील साडेपाचशे गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. राज्यात नेत्यांची निवासस्थाने आणि परिसर आंदोलकांकडून लक्ष होऊ लागल्याने सातारा जिल्ह्यामध्ये राजकीय नेत्यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली. पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय येथील बंदोबस्ताची स्वतः समीर शेख यांनी माहिती घेऊन आढावा घेतला.

    साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे 500 आंदोलकांनी रस्त्यावर बसकन मारून आरक्षण जाहीर केल्याशिवाय आमच्या मांडवात येऊ नका, अशी भूमिका घेतली. कराड ,वाई, फलटण, येथे सुद्धा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी व्यवहार बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता बाजार समितीची आवारे, खाजगी आस्थापना, व्यापारी, दुकाने बंद ठेवल्याने तब्बल दहा कोटी चे व्यवहार ठप्प झाले. दहिवडी येथील एका प्रार्थमिक शाळेमध्ये चक्क शालेय विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा देत “आरक्षण द्या नाहीतर परीक्षेला येणार नाही’, अशी भूमिका घेतली विद्यार्थ्यांची ही अनोखी घोषणाबाजी चर्चेची ठरली.

    अत्यावश्यक सेवा या बंदमधून वगळण्यात आल्या होत्या. त्यामुळे मेडिकल आरोग्यसेवा या व्यवस्थित सुरू होत्या बंदचा फटका काही प्रमाणात विद्यार्थ्यांच्या परिवहनाला बसला. रिक्षावाल्या काकांमध्ये बंद बाबत संभ्रम राहिल्याने काही ठिकाणी पाल्यांच्या परीक्षेसाठी पालकांना स्वतः धावपळ करावी लागली. सातारा परिवहन विभागाच्या सातारा कराड कोरेगाव येथील काही एसटीचे नियंत्रित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची तेथे गैरसोय झाली. एकंदर सातारा जिल्ह्यात बंदला अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीने केला आहे.