ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होणार, सदावर्तेंच्या एसटी कामगार संघटनेकडून संपाची हाक; नेमकं काय आहेत मागण्या?

एसटी महामंडळाचं शासनात विलीनिकरण करावं, या मागणीसाठी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत. आजपासून म्हणजेच ६ नोव्हेंबरपासून एसटी बंदची हाक देण्यात आली आहे.

  मुंबई : दिवाळीच्या तोंडावर संप करून प्रवाशांना वेठीस धरायचे आणि महामंडळात वर्चस्व सिद्ध करायचे, असा कामगार संघटनेचा पायंडा एसटी महामंडळात रुजत आहे. यात आता गुणरत्ने सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाची भर पडली आहे. जनसंघाने आज, सोमवारपासून राज्यात चक्का जाम आंदोलनाची हाक दिली आहे.

  एसटी कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन केलं जाणार असल्याची नोटीस जनसंघाच्या अध्यक्ष जयश्री पाटील यांनी एसटी महामंडळाला रविवारी दिली आहे. त्यामुळं आता दिवाळीला एसटी बसने घरी जाणाची वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये, त्यांनी कामावर हजर राहावं, असं आवाहन महामंडळाकडून करण्यात आलं आहे.

  एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?

  एसटीचं शासनात विलिनिकरण, सातवा वेतन आयोग लागू करणे, शिस्त आवेदन पद्धती आणि अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचारी विविध शहरांमध्ये काम बंद ठेवून आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असतानाच आता आणकी एका आंदोलनाने जोर धरल्याने शिंदे-फडणवीस सरकारचं टेन्शन वाढलं आहे.

  सरकार चर्चा करण्याची शक्यता

  सदावर्ते यांच्या इशाऱ्यानंतर महामंडळाने पत्रातून भूमिका मांडली. महामंडळाने चुकीचे मुद्दे मांडले असून सरकारसोबत चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, असे सदावर्तेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात चक्का जाम आंदोलन मागे घेण्यासह मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आज, सोमवारी मंत्री उदय सामंत चर्चा करणार आहेत, अशी शक्यता वरिष्ठ एसटी अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.