इनामदार, जहागिरदार व देशमुख सत्तेपासून वंचित येवू नये यासाठी प्रयत्नशील ; ऍड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघाती आरोप

भाजपविरोधी लाट असून इंडिया घटक पक्षात अद्यापही वंचित बहुजन आघाडी सामील नाही. कारण महाराष्ट्रातील काही राजकीय पक्षातील इनामदार, जहागिरदार व देशमुख हे सत्ता भोगत आहेत. वंचितांना त्यामध्ये स्थान मिळू नये, असा प्रयत्न ते करीत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे. रयतेचा माणूस लढत आहे.

  सातारा : भाजपविरोधी लाट असून इंडिया घटक पक्षात अद्यापही वंचित बहुजन आघाडी सामील नाही. कारण महाराष्ट्रातील काही राजकीय पक्षातील इनामदार, जहागिरदार व देशमुख हे सत्ता भोगत आहेत. वंचितांना त्यामध्ये स्थान मिळू नये, असा प्रयत्न ते करीत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे.
  रयतेचा माणूस लढत आहे. त्यांना पुढे येवून दिले जात नाही. आम्ही पाच लोकसभा मतदारसंघांची मागणी केलेली आहे. ज्याठिकाणी कॉंग्रेसचे 12 उमेदवार पराभूत झालेले आहेत, ती जागासुद्धा देत नाहीत. त्यामुळे मोदीच इंडिया आघाडी संपवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  चीनमधून आलेल्या निधीवर काहीजण चॅनेल चालवित आहेत, म्हणून त्यांची चौकशी केली जातेय. त्या निधीतून देशविरोधी कारवाई केली जात आहे. चीनकडून भाजप सरकारसुद्धा पैसे घेत आहे. मग हे पैसे सरकार देशविरोधी कारवाईसाठी घेत आहे का? याचा त्यांनी खुलासा करावा, अशीही त्यांनी मागणी करत हुकूमशहा हिटलर ने जे केले, ते भाजप करीत असून देशातील पाच प्रमुख हिंदू मंदिरे निवडणुकांच्या आधी सेनेच्या ताब्यात देण्यात यावीत. मंदिराला काहीही होणार नाही आणि पैसेही सुरक्षित राहतील, असा त्यांनी दावा केला.

  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष उद्योगपती अदानी ला पाठींबा देत आहे, हे दाखवून दिले आहे. ते इंडिया आघाडीत असून राहूल गांधींनी अधिकृत निर्णय घेवून याबाबत उत्तर दिले पाहिजे. सध्या ठेकेदारी पद्धतीने न्यायव्यवस्था व इतर ठिकाणी भरती होत असून त्यांना देण्यात येणारे वेतन अनाधिकृत आहे. संविधानामध्ये नोकर भरती प्रक्रिया अधिकार राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग यांना निवडीचा अधिकार आहे, तर त्या पदाला राज्यपाल मान्यता देतात. वेतन देण्यासाठी बजेटमध्ये तरतूद करावी लागते. असे न करणारे हे सरकार मिलीभगत व फ्रॉड सरकार आहे. नांदेडची घटना दुर्दैवी असून तू माझी पाठ खाजवू नको, मी तुझी पाठ खाजवत नाही, असे धोरण सरकारकडून आखले जात असल्याने निवडणुकीत खासदार-आमदार होलसेलरित्या बदल करुन नवीन लॉट आणला पाहिजे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

  जातीनिहाय गणना झाल्याशिवाय महिलांनाही आरक्षणाचा लाभ होणार नाही. त्यासाठी 2035 पर्यंत वाट पहावी लागणार आहे. एमआयएम च्या इम्तियाज जलील ला पन्नास हजार हिंदूंनी मते दिली, तो विचार रुजवला पाहिजे. पण असे न घडल्याने आमचे आता एमआयएम शी कोणतेही संबंध नाहीत. सनातन धर्माबाबत बोलताना क्षुद्र व अती क्षुद्र वर्णव्यवस्था मांडणार्‍या सनातन धर्माविरोधात लाट असून मुस्लीम समाजसुद्धा भयभीत झाला आहे. हिंदू-मुस्लीम दंगल घडविण्यासाठी आरएसएस व बीजेपी प्रेम विवाहानंतर आता धार्मिक विवाह लावत आहेत. बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याची योजना नाही. जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर कामे करीत आहेत, त्यांना आमची सत्ता आल्यावर त्यांना सरकारी सेवेत कायम करणार, असेही आश्‍वासन त्यांनी दिले. पूर्वी मातंग समाज दोरखंड तयार करीत असे. आता ते काम उद्योजक गरवारे करीत आहे. त्यामुळे अनेक उद्योग-व्यवसाय आले तर बहुजनांचे पारंपारिक उत्पन्नाचे साधन कमी होणार आहे, त्याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
  या पत्रकार परिषदेस वंचित बहुजन आघाडीच्या रेखाताई ठाकूर, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, सादिकभाई शेख, गणेश भिसे, अशोक बैले आदी मान्यवर उपस्थित होते.