
दोषींवर कडक कारवाई करावे आणि राज्य सरकार कडून मयत कुटुंबीयांना पंचवीस लाख मदत द्यावे : कॉ.एम एच. यांची मागणी
सोलापूर : सातारा जिल्ह्यात करण्यात आलेल्या या धर्मांध हिंसाचाराचा आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा कडक निषेध करत आहोत. पुसेसावळी येथे हत्या करण्यात आलेल्या युवकाच्या कुटुंबियांना राज्य सरकारने पंचवीस लाख रुपयांची मदत करावी, गेले सहा महिने समाजात धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या समाज माध्यमांच्या गैरवापराचा सखोल तपास करावा, सर्व गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, या हिंसाचारात झालेल्या नुकसानीचे नव्याने पंचनामे करावेत, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे, असे प्रतिपादन माकपचे चे जिल्हा सचिव अॅड.एम.एच शेख यांनी केले.
बुधवार (दि.२७) सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद पूनम गेट येथे सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे मुस्लिम समाजावर हिंसक हल्ला व तरुणाच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ तीव्र धरणे आंदोलन सिटू चे राज्य सचिव अॅड एम.एच.शेख यांच्या नेतत्वाखाली करण्यात आले. ९ सप्टेंबर, २०२३ रोजी सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात मुस्लिम समाजावर भयानक हिंसक हल्ला करण्यात आला. त्यात एका उच्च विद्याविभूषित मुस्लिम युवकाची हत्या करण्यात आली. तसेच, कित्येक निरपराध नागरिक गंभीर जखमी झाले. राज्य सरकार राज्यातील अल्पसंख्याक आणि दलितांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे, हेच सातारा जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांवरून दिसून येते.
गेले काही महिने सातारा जिल्ह्यात नियोजनबद्ध पद्धतीने मुस्लिम समाजाच्या विरोधात भावना भडकावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचीच परिणती पुसेसावळीच्या शोकात्म आणि संतापजनक घटनेत झाली आहे. परिस्थिती प्रक्षोभक झाली असल्याचे माहीत असूनही पोलीस आणि प्रशासनाने त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. या हिंसाचारास भाजपचे राज्य उपाध्यक्ष विक्रम पावसकर जबाबदार असल्याचा स्पष्ट आरोप सातारा जिल्ह्यातील स्थानिक नागरिक जाहीरपणे करत आहेत. मुस्लिम तरूणांचे मोबाईल हॅक करून त्यावरून मुद्दाम चिथावणीखोर संदेश पाठवण्याचे कारस्थान जिल्हाभर राबवले जात असल्याचे दिसून आले आहे.
शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातही अशाच प्रकारच्या घटना घडवण्यात आल्या आहेत. कांही विघ्नसंतोषींकडून हिंदू-मुस्लिम सलोखा जाणीवपूर्वक उध्वस्त केला जात आहे. कायद्याच्या राज्याला आव्हान देणाऱ्या या गुन्हेगारी टोळक्यांचा बंदोबस्त करणे ही राज्य शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे.
यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे कॉ.सिद्धप्पा कलशेट्टी, कॉ.कमिनी आडम, कॉ नसीमा शेख आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व्यंकटेश कोंगारी यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दत्ता चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कॉ सिद्धप्पा कलशेट्टी, कॉ व्यंकटेश कोंगारी, म.हनिफ सातखेड,शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, कमिनी आडम, शंकर मिस्त्री, मारेप्पा फंदीलोळू, लिंगव्वा सोलापूरे, शकुंतला पाणीभाते, बापू साबळे, नरेश दुघाणे, दीपक निकंबे,पुष्पा पाटील, किशोर मेहता, बाबू कोकणे, शहाबुद्दीन शेख, सनी शेट्टी,अमित मंचले, हसन शेख, रफिक काझी,वसीम मुल्ला, वसीम देशमुख, जावेद सगरी, मोहन कोक्कुल, आरिफा शेख, मोहोम्मदी शेख, कादर शेख, शाम आडम,मल्लेशम कारमपुरी,आदींनी परिश्रम घेतले.