Strong opposition from NCP to the inquiry of MLA Rohit Pawar, dharna movement in front of the administrative building

  बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या ईडीमार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती येथील कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरुन निषेध केला. बारामती शहरातील प्रशासकीय भवन या ठिकाणी सुमारे एक तास ठिय्या मांडून या चौकशीप्रकरणी सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
  सरकारला कोंडीत पकडण्याचे काम
  रोहित पवार हे राज्यातील सामान्य नागरिक, विद्यार्थी, युवा, शेतकरी, महिला यांच्या मुद्द्यांवरही ते सरकारला कोंडीत पकडण्याचे काम करीत आहेत. केवळ आपल्या मतदारसंघापुरतेच मुद्दे ते मांडत नाहीत. तर राज्यातील विविध घटकांचे मुद्दे ते आक्रमकपणे मांडत आहेत. आमदार म्हणून विधानसभेत आणि रस्त्यावरची लढाईही आमदार रोहित पवार हे लढत असल्याचे दिसते.
  राज्यातील मोठी संघर्षयात्रा
  राज्यातील युवांच्या प्रश्नावर नुकतीच त्यांनी पुणे ते नागपूर अशी तब्बल ८०० कि.मी. हून अधिक लांबीची युवा संघर्ष यात्रा काढून त्याकडे सरकारचे लक्ष वेधलेच पण सोबतच शेतकरी, महिला, कामगार, बेरोजगार यांचे मुद्देही आक्रमकपणे मांडले. युवा संघर्ष यात्रेच्या समारोपाला तर त्यांचा आक्रमकपणा आणि त्यांना मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद संपूर्ण राज्याला बघायला मिळाला.
  सरकारकडून सुडाची कारवाई 
  त्यामुळेच लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या या युवा नेत्याला रोखण्यासाठी सरकारकडून सुडाची कारवाई केली जात असून, ईडीच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्यामागे लावल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. लोकशाहीमध्ये लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या नेत्याविरोधात कारवाई केली जात असेल आणि त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ते धोकादायक आहे.
  भाजप, अजित पवार गटातील अनेक राज्य सहकारी बॅंकेच्या संचालकपदी
  आज आमदार रोहित पवार यांची चौकशी ज्या राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणावरून केली जात आहे, त्या राज्य सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळांची यादी पाहिली तर त्यापैकी अनेकजण आज भाजपमध्ये किंवा अजित पवार गटामध्ये किंवा शिंदे गटामध्ये आहेत. त्यात स्वतः अजित पवार यांच्यासह अमरसिंह पंडीत, सुनील फुंदे, नितीन पाटील, माणिकराव कोकाटे, रामप्रसाद बोर्डीकर, शेखर निकम, विजयसिंह मोहिते पाटील, राजन तेली, दिलीपराव सोपल, आनंदराव अडसूळ, धनंजय दलाल यांचा समावेश आहे.
  ‘चोर सोड़न सन्याशाला फाशी’ 
  शिवाय या बरखास्त संचालक मंडळाविरोधात गुन्हा दाखल असून यामध्ये रोहित पवार यांचा काहीही संबंध नाही. परंतु या सर्वांभोवती सत्तेचे कवच असल्याने त्यांची कोणतीही चौकशी केली जात नाही परंतु आमदार रोहित पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांची मात्र चौकशी केली जात असून ‘चोर सोड़न सन्याशाला फाशी’ देण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
  कन्नडचा साखर कारखाना सर्वाधिक बोली लावून खरेदी
  तसेच नाबार्डचा अहवाल आणि उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेनुसार दाखल झालेला गुन्हा हा २०१० चा असून आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने कन्नड येथील साखर कारखाना हा २०१२ साली लिलावामध्ये ५०.२० कोटी इतकी सर्वाधिक बोली लावून खरेदी केलेला आहे. त्यामुळे राज्य बँकेकडून बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणात आमदार रोहित पवार यांचा दुरान्वयेही संबंध नाही. शिवाय २०१९ मध्ये ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासात कोणताही बेकायदेशीर व्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट झाले.
  त्यामुळे हा तपासही बंद करण्यात आला आहे. परंतु केवळ त्रास देण्याच्या हेतूनेच या सरकारकडून आमदार रोहित पवार यांची चौकशी करत असून लोकांचे प्रश्न विचारणाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे या आंदोलकांचे म्हणणे आहे. याविरोधातच हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी आक्रमकपणे सरकारविरोधात घोषणाबाजी करून निषेध केला.
  या आंदोलनात तालुका अध्यक्ष ॲड एस. एन जगताप, शहराध्यक्ष ॲड संदीप गुजर, शहर युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे ,तालुका युवक अध्यक्ष बोरकर यांच्यासह पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते व सामान्य नागरीक सहभागी झाले होते.