पवना बंदिस्त जलवाहिनीला तीव्र विरोध; सर्व पक्षीय कृती समितीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

मावळ तालुक्यातील शेतकरी जो निर्णय घेईल त्या निर्णयाशी मी बांधील - आमदार सुनील शेळके यांची भूमिका

    वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील शेतकरी जो निर्णय घेईल त्या निर्णयाशी मी बांधील आहे.पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प बंद झालाच पाहिजे माझा नेता जरी पाईप लाईन चालू करायला आला तरी मी माझ्या पदाच राजीनामा देईन असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी शेतकऱ्यांना त्यांना दिला आहे.

    पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा या मागणीसाठी मावळ तहसील कार्यालयावर सर्व पक्षीय कृती समितीचा शुक्रवार दि १५ रोजी मोर्चा काढण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

    यावेळी मोर्चात आमदार सुनील शेळके माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी मंत्री मदन बाफना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, मनसे तालुकाध्यक्ष रूपेश म्हाळसकर,
    काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ गुलाब म्हाळसकर, रामदास काकडे, किशोर भेगडे भाजप महिलाध्यक्ष सायली बोत्रे, काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा प्रतिमा हिरे, एकविरा कृती समितीचे भाई मोरे, यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

    बाळा भेगडे काय म्हणाले?

    9 ऑगस्ट 2011 ला मावळ तालुका भारतीय जनता पार्टी, भारतीय किसान संघ, काँग्रेस, शिवसेना, आर.पी. आय. या सर्व पक्षांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड बंद जलवाहिनीच्या विरोधात मावळ बंद व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात जगाच्या इतिहासात शेतकऱ्यांवर करण्यात आलेला गोळीबाराची दुर्दैवी घटना घडली. त्यामध्ये 3 शेतकऱ्यांना शहीद व्हावे लागले व अनेकांना शरीराच्या अवयवावर गोळ्या लागून अनेकजन गंभीररित्या जखमी झाले.

    या घटनेची संपूर्ण देशात दखल घेण्यात आली आणि सगळीकड़े तत्कालीन सरकारच्या या आडमुठी धोरणाचा जाहिर निषेध करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या बंद जलवाहिनी प्रकल्पाला स्थगिती देण्याचे आदेश दिले. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून होणारी ही योजना या ठिकाणच्या शेतकरी व संघटनाना कधीही विश्वासात न घेता पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

    आमदार सुनील शेळकें,बाळा भेगडे, माजी मंत्री मदन बाफना सूर्यकांत वाघमारे, अ‍ॅड दिलीप ढमाले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे व रवींद्र भेगडे आदींची भाषणे झाली. रावेतवरून बंद जलवाहिनीद्वारे पाणी नेण्यास कायम विरोधच आहे. ही योजना कायमस्वरूपी बंद व्हावी. असाच सर्वांच्या भाषणाचा सूर होता.

    मावळ तालुक्यातील शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरून या बंद जलवाहिनीच्या विरोधात आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे व ह्या बंद जलवाहिनी प्रकल्पास वरील सर्व पक्षांचा विरोध असून ती कायमस्वरूपी रद्द व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली याबाबत तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले‌.