पुणे विद्यापीठात वादग्रस्त रामायणावर आधारित नाटक ABVP ने पाडले बंद; विभागप्रमुखांसह सहा जणांना अटक

ललित कला केंद्राकडून विद्यापीठामध्ये प्रभू श्रीराम यांना राखी सावंत व देवी देवतांच्या पात्राच्या मुखातून शिव्या आणि आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली. त्यानंतर अभाविप पुणे महानगरच्या कार्यकर्त्यांनी हे आक्षेपार्ह नाटक चालू असताना मध्ये पडत हे नाटक बंद पाडले.

    पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील (SPPU) ललित कला केंद्र (Lalit Kala Kendra) या विभागाकडून रामायणावर आधारित नाटक सादर करण्यात आले. मात्र हे नाटक सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. विद्यापीठामध्ये सादर करण्यात आलेल्या या नाटकामध्ये (Controversial drama) प्रभू श्रीराम (Prabhu Ram) व सीता माता (Sita) यांची भूमिकेवर आक्षेप घेतला जात आहे. यामध्ये या दोन्ही भूमिका विदूषक प्रमाणे दाखवण्यात आल्याचा आरोप अभाविपने (ABVP) करत नाटक चालू असताना मध्ये घुसून हे नाटक बंद पाडले. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या प्रकरणानंतर पोलिसांनी (Pune Police) कारवाई देखील केली आहे.

    ललित कला केंद्राकडून विद्यापीठामध्ये प्रभू श्रीराम यांना राखी सावंत व देवी देवतांच्या पात्राच्या मुखातून शिव्या आणि आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली. त्यानंतर अभाविप पुणे महानगरच्या कार्यकर्त्यांनी हे आक्षेपार्ह नाटक चालू असताना मध्ये पडत हे नाटक बंद पाडले. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात असून याबाबत अभाविपंकडून पोलिसांत तक्रार देखील देण्यात आली. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी विभागप्रमुख विभाग प्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना अटक केली आहे, अशी माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. विभाग प्रमुख भोळे  यांना नाटक सादर करण्यापूर्वी किमान त्यांनी संहिता वाचायला हवी होती. भावना दुखावून समाजात तेढ निर्माण करणे हा दखलपात्र गुन्हा असल्याचे मगर यांनी स्पष्ट केले.

    वादग्रस्त रामायणावर आधारित नाटकावर कलाकरांची प्रतिक्रिया

    पुण्यातील या वादग्रस्त नाटकांचा आणि अभाविपने केलेल्या हस्तक्षेपाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर अनेक कलाकारांनी माध्यमांवर आपले मत व्यक्त केले. ज्येष्ठ अभिनेते वैभव मांगले यांनी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांना मारहाण केली गेली असेल तर या कृत्याचा जाहीर निषेध, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच रंगकर्मी दीपक राजाध्यक्ष यांनी नाटक बंद पाडण्याच्या घटनेचा निषेध करून ललित कला केंद्राला पाठिंबा दिला. त्याचबरोबर दिग्दर्शक संगीतकार अजय नाईक यांनी या नाटकावरून टीका केली. ‘आम्ही कॉलेज जीवनात अनेक सादरीकरणे केली. रामलीला नावाचे नाटक सादर करता आणि राम-सीता यांचे वस्त्र परिधान करून तोंडी शिवराळ संवाद? हे होतंय पुणे विद्यापीठात? कोण आहेत ही लोकं? कोण आहेत हे शिक्षक जे असले ‘ललित’ विद्यार्थी घडवत आहेत? ‘वैचारिक दारिद्र्य’ आणि ‘वैचारिक अधोगती’ आहे ही. मी धिक्कार करतो या विकृतीचा,’  अशा शब्दांत वादग्रस्त नाटकांवर टीकास्त्र डागलं आहे.