विद्यार्थ्यांचे लॅपटॉप चोरणारा अटकेत; डिलिव्हरी बॉयचे काम करायचा अन्…

सिंहगड रोड, वारजे, अलंकार भागात महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या रूममधून महागडे लॅपटॉप, मोबाईल, स्मार्टवॉच चोरणार्‍या चोरट्याला वारजे पोलिसांनी अटक केली.

    पुणे : सिंहगड रोड, वारजे, अलंकार भागात महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या रूममधून महागडे लॅपटॉप, मोबाईल, स्मार्टवॉच चोरणार्‍या चोरट्याला वारजे पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीचे ९ लॅपटॉप, ४ मोबाईल, दोन दुचाकी असा ४ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हा दिवसा डिलिव्हरी बॉयचे काम करून इतरवेळी चोऱ्या करायचा.

    तेजस दत्तात्रय सूर्यवंशी (२३, रा. नांदेड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे व त्यांच्या ही कारवाई केली.

    तेजस हा शिक्षीत असून मागील एका वर्षापासून तो पुण्यात शिक्षणासाठी आला होता. इतरवेळी तो नामांकित कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करायचा. दरम्यान, मागील काही दिवसांत वारजे भागात विद्यार्थ्यांच्या रूममधून लॅपटॉप चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. याप्रकरणी दाखल गुन्ह्यांचा तपास वारजे पोलिसांकडून सुरू होता.

    पोलीस उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ निरीक्षक मनोज शेडगे यांच्या मार्गदर्शनखाली तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक तपास केला. त्यावरून लॅपटॉप चोरीचे गुन्हे तेजस याने केल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानूसार सापळा रचून तेजसला ताब्यात घेण्यात आले.

    लॅपटॉपबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलीसी खाक्या दाखविताच त्याने शहरातील सिंहगड, वारजे तसेच अलंकार भागात लॅपटॉप तसेच पुर्वी नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथून दुचाकी चोरल्याचे कबूल केले. त्यानूसार पोलिसांनी तेजस याला अटक केली.