पारंपारिक शिक्षणापेक्षा तंत्रज्ञानयुक्त शिक्षण विद्यार्थ्यांनी घ्यावे : सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक राजेंद्र जगदाळे

आजच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणाचा प्रवाह सोडून लवकरात लवकर स्वावलंबी बनवणारे तंत्रज्ञानयुक्त शिक्षण ग्रहण करून स्वतःच्या पायावर उभे राहावे. खाजगीकरणामुळे कायम स्वरूपाची नोकरी मिळेल ही अपेक्षा बाळगणे आता गैर आहे असे प्रतिपादन सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक राजेंद्र जगदाळे यांनी केले. 

    सातारा : आजच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणाचा प्रवाह सोडून लवकरात लवकर स्वावलंबी बनवणारे तंत्रज्ञानयुक्त शिक्षण ग्रहण करून स्वतःच्या पायावर उभे राहावे. खाजगीकरणामुळे कायम स्वरूपाची नोकरी मिळेल ही अपेक्षा बाळगणे आता गैर आहे असे प्रतिपादन सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक राजेंद्र जगदाळे यांनी केले.
    रयत शिक्षण संस्थेच्या १०४ व्या वर्धापन दिनानिमित्त कर्मवीर समाधी परिसरात विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जगदाळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन एडवोकेट भगीरथ शिंदे, संघटक डॉक्टर अनिल पाटील, सचिव विकास देशमुख, खासदार श्रीनिवास पाटील, सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे, प्रभाकर देशमुख, सारंग पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
    यावेळी बोलताना जगदाळे पुढे म्हणाले महाविद्यालयात आल्यावर मुलांना घरून पैसे आणण्याची वेळ येऊ नये यासाठी अभ्यासक्रमात काही नवीन पर्यायांचाही उहापोह करायला हवा. पारंपारिक शिक्षण पद्धती आजच्या युगामध्ये कालबाह्य झालेली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः तंत्रज्ञान युक्त शिक्षण ग्रहण केले पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी शैक्षणिक अवस्थेत असतानाच त्याच्या श्रमाला चार पैशांची जोड मिळायला हवी त्यातूनच तंत्रज्ञानधिष्ठीत पिढी जन्माला येणार आहे. पारंपारिक शिक्षणामुळे आपल्याला भविष्यात सरकारी नोकरी मिळेल असे दिवस आता राहिलेले नाहीत खाजगीकरणाचे वारे जोरदार सुरू आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये आणि जीवनामध्ये सुसह्य होण्यासाठी सतत ज्ञान मिळवण्याबरोबर तंत्रज्ञानाचे प्रयोग करत राहणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान निश्चित शिक्षण पद्धतीच भविष्याची खरी ओळख आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले. संस्थेच्या १०४ व्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या वतीने आयोजित विविध विशेष अंकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर समाधी परिसरातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर स्वागत गीताने झाली तसेच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर  गुणवंत विद्यार्थी आणि आदर्श शिक्षकांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. संघटक डॉ. अनिल पाटील यांनी संस्थेच्या कार्य विस्ताराचा आढावा घेतला.