दिव्यांग विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कलाविष्काराने जिंकली रसिकांची मने

निसर्गाने अन्याय केला असला तरी देखील हम भी कुछ कम नहीं…या जोशात मल्हारी पिवळा झाला…मल्हारी माझा बसून घोड्यावरी…आल्या आदिवासी वादळ…या लोकगीतांवर वेशभूषा करून बहारदार अभिनय व नृत्याचा अविष्कार करुन सोलापूर शहर व जिल्ह्यातील जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविले.

    सोलापूर : निसर्गाने अन्याय केला असला तरी देखील हम भी कुछ कम नहीं…या जोशात मल्हारी पिवळा झाला…मल्हारी माझा बसून घोड्यावरी…आल्या आदिवासी वादळ…या लोकगीतांवर वेशभूषा करून बहारदार अभिनय व नृत्याचा अविष्कार करुन सोलापूर शहर व जिल्ह्यातील जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविले.
    जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने मंगळवारी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह (रंगभवन) येथे सोलापूर शहर व जिल्ह्यातील दिव्यांग शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत चाललेल्या या बहारदार कार्यक्रमात मतिमंद, अंध, मुकबधीर, अस्थिव्यंग या प्रवर्गातील 36  शाळांमधील कलाकारांनी भाग घेतला होता. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर यांच्या हस्ते नटराजाच्या मूर्तीचे व रंगमंचाचे पूजन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
    जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्या व भाजपाच्या नेत्या रोहिणी तडवळकर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर, बसवराज जेऊरे,नॅबचे रामचंद्र कुलकर्णी, दामाजी अपंग सेवा मंडळाचे सचिव चित्रसेन पाथरुट, कमलाकर तिकटे, समीर तडवळकर, अरुण धोत्रे, संदीप बरडे,यावेळी उपस्थित होते.
    मतिमंद व मुकबधीर प्रवर्गातील विद्यार्थी कलाकारांनी केलेला अभिनय पाहून रसिक भारावून गेले होते. बाभूळगाव येथील नागनाथ मुकबधीर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मल्हारी पिवळा झाला…हळद लागली बाणाईला, कुर्डुवाडीच्या मतिमंद शाळेतील कलाकारांनी मल्हारी माझा बसून घोड्यावरी, राजीव गांधी अंध शाळेतील विद्यार्थ्यांनी माय भवानी हे गोंधळगीत सादर करुन वाहवा मिळविली. तर पंढरपूर येथील नवजीवन अपंग निवासी शाळेतील विद्यार्थिनी अनिता बाबर या विद्यार्थीनीने मला प्रितीच्या झुल्यावर झुलवा, या लावणीवर धरलेला नृत्याचा ठेका सर्वांनाच भुरळ पाडणारा होता.
    अक्कलकोट येथील मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्याची व्यथा, हे रिमिक्स अभिनय सादर केल्यानंतर उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पानावल्या. करमाळा येथील जगदंबा कमलाभवानी मुकबधीर विद्यालयाच्या कलाकारांनी आल्या आदिवासी वादळ या लोकगीतावर केलेले अभिनय नृत्य तूफान गाजले, तर लवंगी येथील मुक्ताई मतिमंद बालगृहातील विद्यार्थी कलाकारांनी रिमिक्स फिल्मी गीतालाही टाळ्यांचा पाऊस पडला.
    सकाळी अकरा वाजता सुरु झालेला हा कलाविष्काराचा कार्यक्रम दिवसभर सुरु होता. मच्छिंद्र अंगुले व मंजुषा काटकर यांनी या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले. सोलापुरातील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक प्रसाद विभुते व आरती मठपती यांनी या कार्यक्रमाचे परीक्षण केले.