subhash desai and uddhav thackeray

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण ( Bhushan Desai) हा शिंदे गटात प्रवेश करणार आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातोय.

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नेते, माजी मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. ते लवकरच शिवसेना शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश करण्याची शक्यता आहे. सुभाष देसाई (Subhash Desai) शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आणि उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे खासदार गजानन किर्तीकर यांच्यानंतर सुभाष देसाई यांच्या घरातही फूट पडण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत फूट पडली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार आणि 13 खासदारांनी जाण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात त्यानंतर सत्तांतर झाले. शिवसेना कुणाची यावरुन सध्या कोर्टात वाद सुरु आहे. निवडणूक आयोगानं शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या शिवेसेनेला दिला. अशातच उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण ( Bhushan Desai) हा शिंदे गटात प्रवेश करणार आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातोय.

भूषण देसाई आजच बाळासाहेब भवनात मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहे. भूषण देसाई यांच्यासोबत अनेक कार्यकर्तेही शिवसेनेत प्रवेश करतील.

भरत गोगावले काय म्हणाले ?
सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई शिंदे गटात प्रवेश करतोय याबाबत आमदार भरत गोगावले यांना विचारलं असता आम्ही त्यांच्या स्वागतासाठी तयार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

बापलेकाची जोडी
गजानन कीर्तिकर आणि अमोल कीर्तिकर यांच्यानंतर आता दुसरी बापलेकाची जोडी शिंदे गटात जाणार का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. भूषण देसाई यांच्यानंतर सुभाष देसाई शिंदे गटात प्रवेश करणार का? असंही काहीजण विचारत आहेत.

भूषण देसाईंवर भाजपचे आरोप
चार महिन्यांपूर्वी भाजपने भूषण देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. प्रसाद लाड यांनी भूषण देसाई यांच्यावर वसुलीचे गंभीर आरोप केले होते. भूषण देसाई यांच्यावर एजंटगिरीचे आरोप केले होते.