दहावीच्या निकालात मुंबई महापालिकेच्या शाळांचे यश!

बृहन्मुंबई महापालिकेच्या (BMC) आठ माध्यमाच्या २४३ माध्यमिक शाळांमधून एसएससी (SSC) मार्च २०२२ परीक्षा निकालात १६,३१९ विद्यार्थी उत्तीर्ण (Pass) झाल्याने शाळांचा सरासरी निकाल ९७.१० टक्के लागला आहे.

    बृहन्मुंबई महापालिकेच्या (BMC) आठ माध्यमाच्या २४३ माध्यमिक शाळांमधून एसएससी (SSC) मार्च २०२२ परीक्षेसाठी १६,८०७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. प्राप्त निकालानुसार १६,३१९ विद्यार्थी उत्तीर्ण (Pass) झाल्याने महापालिकेच्या शाळांचा सरासरी निकाल ९७.१० टक्के लागला आहे. हा निकाल राज्य आणि मुंबई (Mumbai) विभागाच्या सरासरी ९६.९४ टक्के निकालाच्या तुलनेत जास्त आहे. यामध्ये २९३३ विद्यार्थ्यांनी ७५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण संपादन केले असून ७७२४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. १०७ शाळांचा निकाल १०० टक्के आहे. ९९.९९ टक्के निकाल असणाऱ्या ४८ शाळा आणि ९० ते ९४.९९ टक्के निकाल असणाऱ्या ८ शाळा आहेत.

    बांद्रा पूर्व येथील खेरनगर इंग्रजी मुंबई पब्लिक स्कूल क्रमांक–१ या शाळेतील सिमरन आत्मप्रसाद लोधी या विद्यार्थिनीने ९५ टक्के गुण संपादन करत मनपाच्या सर्व शाळांमधून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. मीठानगर इंग्रजी मुंबई पब्लिक स्कूल, गोरेगाव या शाळेतील प्राची ज्ञानदेव दळवी आणि गोशाळा इंग्रजी मुंबई पब्लिक स्कूल, मुलुंड या शाळेतील संतोष सुरेन्द्र शेट्टी या दोन्ही विद्यार्थ्यांनी ९४ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. तसेच, नायगाव मुंबई पब्लिक स्कूल या शाळेतील हिन्दी माध्यमाच्या श्रद्धा हिरालाल यादव या विद्यार्थिनीने ९३.४० टक्के गुण संपादन करत तृतीय क्रमांक मिळविला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे.

    शासनाच्या कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्वांचे पालन करत महापालिका शिक्षण विभागाने एस.एस.सी. निकाल वृद्धीसाठी नियोजन करुन शिक्षकांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन अध्यापन नोव्हेंबरपूर्वी पूर्ण केले. शिकवून झालेल्या भागावर ऑनलाईन ‘साप्ताहिक परीक्षा’ आणि दरमहा ‘वर्कशीटची निर्मिती’ करुन विद्यार्थ्यांकडून सोडवून तपासून देण्यात आल्या. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषयात ८० पैकी किमान ३५ गुण मिळावेत यासाठी अत्यंत सोप्या आशयाची निर्मिती करून ‘मिशन -३५’ पुस्तिकेची निर्मिती करुन विद्यार्थ्यांना वाटप करून सोडवून देण्यात आल्या.

    विद्यार्थ्यांचा सराव होण्याकरिता डिसेंबरपासून बोर्डाच्या धर्तीवर शाळा स्तरावर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने पाहून ‘पाच सराव प्रश्नपत्रिका संच’ आणि न पाहता ‘पाच सराव प्रश्नपत्रिका संच’ असे मिळून किमान १० सराव प्रश्नपत्रिका संच सोडवून घेण्यात आले होते. याशिवाय अधिकाऱ्यांना सर्व ‘शाळा दत्तक’ देऊन शाळांना मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षकांसाठी कार्यशाळा आणि विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय ’४० झूम व यु-ट्युब चॅनेल्स’ च्या माध्यमातून ‘ऑनलाईन विशेष व्याख्यानमाला व प्रेरणादायी कार्यक्रम’ आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थी-शिक्षक-पालक-मुख्याध्यापक-पर्यवेक्षीय यंत्रणा यांच्यामध्ये समन्वय ठेवून वेळोवेळी ‘सहविचार सभा’ घेण्यात आल्या.