हातखंबा येथील कुटुंबाची यशोगाथा, मुलासह आई-वडीलही एकाचवेळी बारावी परीक्षा उत्तीर्ण

रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथे आई, वडील व मुलगा एकाचवेळी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल, शिक्षणाच्या लालसेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यश मिळवण्यासाठी वयाचे बंधन नाही तर जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी हवी असे म्हटले जाते. त्यामुळे शिक्षण किती महत्वाचे आहे, हे लक्षात येते. हेच महत्व या कुटुंबाने खरे करून दाखवले आहे.

  रत्नागिरी : शिक्षण (Education) हे वाघिणीचे दूध आहे. जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही़. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar) यांच्या या विचारातून शिक्षण किती महत्वाचे (Important) आहे हे अधोरेखित होते. यामुळे आता अनेकजण शिक्षणावर भर देत आहेत. जरी आपण शिकलो नाही तरी आपली मुलं शिकायला पाहिजे, अशीच धारणा ग्रामीण भागात पाहायला मिळते; मात्र आता मुलांसह आई-वडिलही शिक्षण घेताना दिसत आहेत, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

  यापूर्वी आपण ७० वर्षाच्या वृद्धानेही बोर्डाची परीक्षा दिल्याच्या घटना वाचल्या वा ऐकल्या आहेत. त्याचशिवाय सूनबाई, सासरे व दीर एकाच वर्षी बारावी परीक्षा पास झाल्याचेही पाहिले आहे. अशीच एक घटना रत्नागिरीमधून समोर आली आहे. तालुक्यातील हातखंबा येथे आई, वडील व मुलगा एकाचवेळी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल, शिक्षणाच्या लालसेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यश मिळवण्यासाठी वयाचे बंधन नाही तर जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी हवी असे म्हटले जाते. त्यामुळे शिक्षण किती महत्वाचे आहे, हे लक्षात येते. हेच महत्व या कुटुंबाने खरे करून दाखवले आहे.

  हातखंबा येथील बौद्धवाडी येथे राहणाऱ्या कांबळे कुटुंबातील तिघांनी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत यश संपादन केले आहे. या एकाच कुटुंबातील तिघांनी बारावी परीक्षेत उत्तम गुण संपादन करून इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे. शिक्षणाचे महत्व आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही दिसून येत आहे. ही घटना सोशल मीडियासह तालुक्यात सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.

  बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यानंतर बारावी पास झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेकजणांनी काबाड कष्ट करत, मोलमजुरी करत बारावीची परीक्षा पास केली आहे. अशातच रत्नागिरी तालुक्यातून एक सुखद धक्का देणारी घटना समोर आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथील कांबळे कुटुंबियातील तिघांनी बारावीची परीक्षा देत उत्तीर्ण झाले आहेत. याहून विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे या कुटुंबातील मुलग्यासह आई -वडील ही एकाच वर्षी उत्तीर्ण झाले आहेत.

  राजन कांबळे (वय ४५) व रोहित कांबळे (वय १९) अशी या दोघा पिता पुत्राची नावे आहेत. तर रोहिणी कांबळे (वय ४२) असे आईचे नाव आहे. राजन कांबळे यांनी वयाच्या ४५ व्या वर्षी परीक्षा दिली. त्यांच्या मुलासह आईने देखील वडीलाबरोबरच बारावीचा गड सर केला आहे.

  वडिलांची इच्छा पत्नीने केली पूर्ण

  या यशानंतर राजन कांबळे म्हणाले की, लग्नापूर्वी पत्नीचा बारावीमध्ये एक विषय राहून गेला होता. तिच्या शिक्षणाविषयी माझ्या वडिलांची इच्छा होती की, सुनेने बारावीची पुन्हा परीक्षा देऊन यश मिळवावे. हीच वडिलांची इच्छा मनी बाळगून तिने मला ही बारावी परीक्षा देण्यासाठी आग्रह केला. यातून आम्ही दोघे ही बारावी उत्तीर्ण झालो. या यशामागे आईची साथ दडलेली आहे. ऑनलाईन, ऑफलाईन अभ्यासासाठी आम्हा दोघांना बारावीत असणाऱ्या मुलाने ही उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. आज आम्ही दोघे ही बारावी उत्तीर्ण झालो. माझ्या वडिलांची इच्छा पत्नीने पूर्ण केली आहे. याचा खूप आनंद वाटतोय.

  समाजासमोर नवा आदर्श

  या तिघांनी मार्च २०२२ मध्ये बारावीची परीक्षा दिली होती. रोहित राजन कांबळे याला विज्ञान शाखेतून ५२ टक्के गुण मिळाले असून त्याचे वडील राजन कांबळे यांना कला शाखेतून ५४ टक्के गुण मिळाले आहेत तर आई रुचिता यांना कला शाखेतून ५६ टक्के गुण मिळाले आहेत.

  घर व कुटुंब सांभाळून प्रदीर्घ कालावधी नंतर सुखी संसाराच्या जीवनातून या आई-वडिलांनी अभ्यासाचे योग्य पद्धतीने नियोजन करून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल व शिक्षणाच्या लालसेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.