खडकाळ माळरानात कारल्याची यशस्वी लागवड; पाच लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा

कडू कारले तुपात तळले किंवा साखरेत घोळले तरी ते कडूच ! अशी जुनी म्हण प्रचलित आहे. परंतु या कडू कारल्यानेच पिंपरी खुर्द (ता. इंदापूर) येथील युवा शेतकरी प्रदीप जनार्दन पवार याच्या जीवनात गोडवा निर्माण केला आहे. एकीकडे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. परंतू, पवार यांनी या काळात खडकाळ जमिनीत कारल्याची केलेली लागवड त्यांना फायदेशीर ठरली आहे.

  इंदापूर : कडू कारले तुपात तळले किंवा साखरेत घोळले तरी ते कडूच ! अशी जुनी म्हण प्रचलित आहे. परंतु या कडू कारल्यानेच पिंपरी खुर्द (ता. इंदापूर) येथील युवा शेतकरी प्रदीप जनार्दन पवार याच्या जीवनात गोडवा निर्माण केला आहे. एकीकडे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. परंतू, पवार यांनी या काळात खडकाळ जमिनीत कारल्याची केलेली लागवड त्यांना फायदेशीर ठरली आहे.

  मुंबई बाजारात कारल्याला चांगला दर

  शेतकरी प्रदीप पवार यांनी ६ सप्टेंबर रोजी एक एकर क्षेत्रात कारल्याची लागवड केली. लागवडीसाठी बियाणे, मांढवं, स्टेजिंग, मल्चिंग पेपर, खते, ड्रीप, मजुरी यासाठी त्यांना साधारणतः सव्वा लाख खर्च आला. परंतू, त्यांचा आत्तापर्यंत अडीच ते तीन टन माल तुटला असून मालाला ३५ ते ४० रुपये दर मिळाला आहे. एकूण पंधरा टन माल निघून एकूण साडेचार लाख ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळेल, अशी खात्री असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, सुरुवातीला चाकण येथील बाजारात त्यांनी माल विकला. सध्या मुंबई बाजारात कारल्याला चांगला दर मिळत असल्याने त्या ठिकाणी विक्री केली जात आहे.

  फळ बागेत विविध प्रयोग करण्याची आवड

  शेतकरी प्रदीप पवार यांनी सांगितले की, मला शेतीत विविध प्रयोग करण्याची आवड आहे. या अगोदर डाळिंब, काकडी, कलिंगड, नागवेली पानाची लागवड केली आहे. पान मळ्यातून एक एकरात साडे पाच लाख रुपये उत्पन्न घेतले असून बाकी पिकातून ही चांगले उत्पन्न मिळवले आहे.

  जमिनीची निवड आणि योग्य व्यवस्थापन

  मोठा पाऊस झाला तरी नुकसान होऊ नये म्हणून खडकाळ जमिनीची निवड केली. पाण्याचा निचरा व्हावा यासाठी चाऱ्या केल्या व कोणती खते, औषधे वापरावी याबाबत खते व बी- बियाणे विक्रेते अमित जनार्धन क्षीरसागर यांचा सल्ला वेळोवेळी घेतला. त्यामुळे पीकाची चांगली वाढ होऊन परतीच्या पावसाने नुकसान झाले नाही, असे पवार यांनी सांगितले.