संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावात श्रावण कोडापे यांच्या गोठ्याला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. गावकऱ्यांच्या सतर्कतेने आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, या आगीत भाजल्याने दोन बैल (Anilmal Injured) जखमी झाले.

    देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावात श्रावण कोडापे यांच्या गोठ्याला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. गावकऱ्यांच्या सतर्कतेने आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, या आगीत भाजल्याने दोन बैल (Animal Injured) जखमी झाले. फटाक्यांची ठिणगी पडून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

    कोडापे यांच्या घरालगत असलेल्या गोठ्यावर फटाक्यांची ठिणगी उडून आग लागल्याचे बोलले जात आहे. गोठ्यातील चारा आणि तणसामुळे काही वेळातच आगीने भडका घेतला. मात्र, शेजारच्या लोकांनी आपापल्या घरातून बकेट आणून जवळच्या विहिरीतून पाणी काढत आग विझवली. यावेळी गोठ्यात असलेल्या दोन बैलांच्या अंगावर आगीने लपटलेले गोठ्याचे छत कोसळले. यात दोन बैल जखमी झाले. गोठ्यातील इतर वस्तू आणि चारा आगीत पूर्णपणे जळून खाक झाला.

    कोडापे यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यांना आता बैलावर उपचार करण्यासाठी काही पैसे खर्च करावे लागणार आहेत. सोबतच जनावरांचा चाराही जळून खाक झाला. दोन्ही बैल जखमी झाल्यामुळे शेती कशी करावी? असा प्रश्न कोडापे यांच्यासमोर निर्माण झाला आहे. शासनाने मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.