बाजारात साखरेचे दर स्थिर, प्रति क्विंटल ३५०० ते ३६०० रुपये दर; मागणीतही काहीशी घट

देशांतर्गत बाजारात साखरेचे दर स्थिर आहेत. सध्या साखरेला मागणी नसल्याने दरातही फारशी सुधारणा होत नसल्याची स्थिती आहे. सध्या साखरेचा दर प्रति क्विंटल ३५०० ते ३६०० रुपयांच्या आसपास आहे. येत्या काही दिवसात सण सुरू झाल्यानंतर मागणी आणि साखरेच्या दरात काहीशी वाढ होऊ शकते, असा अंदाज साखर उद्योगातून व्यक्त करण्यात येत आहे.

  रांजणी : देशांतर्गत बाजारात साखरेचे दर स्थिर आहेत. सध्या साखरेला मागणी नसल्याने दरातही फारशी सुधारणा होत नसल्याची स्थिती आहे. सध्या साखरेचा दर प्रति क्विंटल ३५०० ते ३६०० रुपयांच्या आसपास आहे. येत्या काही दिवसात सण सुरू झाल्यानंतर मागणी आणि साखरेच्या दरात काहीशी वाढ होऊ शकते, असा अंदाज साखर उद्योगातून व्यक्त करण्यात येत आहे.

  साखरेच्या मागणीत काहीशी घट

  गेल्या दोन महिन्यांपासून केंद्र शासन मागणी आणि पुरवठ्यात समन्वय राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. साखर कारखान्यांकडून केंद्राच्यावतीने सातत्याने माहिती मागविण्यात येत आहे. शिल्लक साठा आणि विक्रीची माहिती घेऊन पुढील महिन्याला यानुसार कोटा देण्यात येत असल्याने साखर विक्री करताना कारखान्यांवर फारसा दबाव येत नसल्याचे चित्र आहे. परंतु जूनच्या तुलनेत जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या सप्ताहात साखरेच्या दरात फारशी सुधारणा झाली नाही. पाऊस सुरू झाल्यानंतर साखरेच्या मागणीत काहीशी घट झाली. त्याचवेळी वाढणारे साखरेचे दरही घसरले. ऑगस्ट पासून पावसाने देशात बहुतांश ठिकाणी विश्रांती घेतली. यानंतर काही प्रमाणात साखरेची मागणी व दरही वाढतील अशी शक्यता होती. परंतु अद्याप मागणीत फारशी वाढ नसल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. सणासुदीसाठी अजूनही वेगाने खरेदी सुरू नाही. केंद्राने ही विक्री धीमी असल्याचे लक्षात घेऊन जुलैचा कोटा १५ ऑगस्टपर्यंत विक्री करण्यास परवानगी देऊन कारखान्यांना साखर विक्रीसाठी वेळ दिला आहे.

  दरम्यान महाराष्ट्रात एम -३० साखरेचे दर ३५१० ते ३५६० पर्यंत आहेत. एस-३० जातीचे साखरेचे दर ३६१० ते ३६६० पर्यंत आहेत. कर्नाटक राज्यात एस -३० जातीच्या साखरेचे दर ३५६० ते ३६०० रुपये आहेत. एम-३० जातीचे दर ३६५० ते ३६६० पर्यंत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये एम -३० जातीच्या साखरेचे दर ३६५० ते ३७३० रुपये इतके आहेत. गुजरात राज्यात एस-३०जातीचे साखरेचे दर ३५५१ ते ३५८१ पर्यंत आहेत. एम -३० जातीच्या साखरेचे दर ३६४१ ते ३६७१ पर्यंत आहेत.

  परिणाम साखरेच्या मागणीवर होऊ शकेल

  देशाबाहेर इतरत्र देशातील साखरेच्या किमतीत मोठी वाढ झाली असताना स्थानिक पातळीवर मात्र दरात फाशी सुधारणा नसल्याचे चित्र आहे. निर्यातीला परवानगी नसल्याने साखर बाजाराची उलाढाल केवळ स्थानिक मागणीवरच अवलंबून राहत आहे. येत्या काही दिवसात सण असल्याने याचा सकारात्मक परिणाम साखरेच्या मागणीवर होऊ शकेल, असा आशावाद साखर उद्योगातून व्यक्त केला जात आहे.