लातूरात जिल्ह्यात दीड हजार हेक्टर क्षेत्रात ऊस शिल्लक; शेतकरी चिंतेत

31 मे रोजी लातूर जिल्ह्यातील ऊस शिल्लक राहणार नाही असं कारखानदार सांगत असले तरी जवळपास दीड हजार हेक्टर क्षेत्रात ऊस शिल्लक असल्याची माहिती समोर येत आहे. आता पावासाळ्याच्या तोंडावर ऊस तोड करणाऱ्या टोळ्या करार संपल्याने निघून गेल्या आहेत. आता शेतकरी हार्वेस्टरवर अवलंबून आहेत.

  लातूर : 31 मे रोजी जिल्ह्यातील ऊस शिल्लक राहणार नाही असं कारखानदार सांगत असले तरी जवळपास दीड हजार हेक्टर क्षेत्रात ऊस शिल्लक असल्याची माहिती समोर येत आहे. आता पावासाळ्याच्या तोंडावर ऊस तोड करणाऱ्या टोळ्या करार संपल्याने निघून गेल्या आहेत. आता शेतकरी हार्वेस्टरवर अवलंबून आहेत.

  दरम्यान दोन दिवसांत पावसाची शक्यता असल्यामुळे हार्वेस्टर सुद्धा निरूपयोगी ठरण्याची भीती असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संकटात आहे.

  लातूर जिल्हा हा सोयाबीन आणि उसाच पट्टा अशी ओळख आहे. जिल्ह्यात एकूण 13 सहकारी आणि खाजगी साखर कारखाने असून त्यापैकी 13 चालू तर 3 बंद आहेत. आजच्या तारखेला किमान जिल्ह्यात दीड हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस शिल्लक आहे.

  औसा तालुक्यातील भादा गावातील असेच एक शेतकरी आहेत. जे देशातील प्रतिष्ठित साखर कारखान्यापैकी मांजरा सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत. बब्रुवान नारायण शिवलकर असं या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे 5 एकर ऊस आणि 4 शेअर्स असून तो प्रोग्रामनुसार मार्च अखेर गाळप होण अपेक्षित होत पण 31 मे ची तारीख उजाडली तरी रानात ऊस उभा आहे.

  तापमान आणि पाण्याची कमतरता यामुळे उसाचे वजन किमान 125 टनाची घट आल्याने किमान साडेतीन लाखाच नुकसान सोसावं लागत आहे. बब्रुवान याचे शेअर्स असूनही कारखाने बंद व्हायची वेळ आली तरी शेतात ऊस उभा असल्याने आर्थिक संकटाला सामोरे जावं लागत आहे.

  आता करार संपल्याने ऊस तोड टोळ्या निघून गेल्या आहेत. कारखानदार हार्वेस्टरवर अवलंबून आहेत. या दीड हजार हेक्टर क्षेत्रातील ऊस उत्पादकांना शासनाने एकरी एक लाखची मदत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सत्तार पटेल यांनी केली आहे.

  शासन, प्रशासन आणि साखर कारखानदार उसाची तोडणी करणार असल्याचे सांगत आहेत. पण खरीपासाठी शेती करायची कशी तर उसासाठी खर्च केलेला कसा भरून निघणार हीच समस्या आहे.