एफआरपीसाठी ऊसतोडी बंद पाडल्या; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊसाला एकरकमी एफआरपी, ऊसाच्या वजनाची काटामारी थांबविण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यात गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊस तोड बंद आंदोलन सुरू झाले. पहिल्या दिवशी पलूस, वाळवा, कडेगाव, खानापूर आणि मिरज तालुक्यात अनेक ठिकाणी ऊसतोडी बंद पाडण्यात आल्या. विविध कारखान्यांकडे जाणाऱ्या अडीचशेहून ट्रॅक्टर रोखण्यात आले.

  सांगली : ऊसाला एकरकमी एफआरपी, ऊसाच्या वजनाची काटामारी थांबविण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यात गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊस तोड बंद आंदोलन सुरू झाले. पहिल्या दिवशी पलूस, वाळवा, कडेगाव, खानापूर आणि मिरज तालुक्यात अनेक ठिकाणी ऊसतोडी बंद पाडण्यात आल्या. विविध कारखान्यांकडे जाणाऱ्या अडीचशेहून ट्रॅक्टर रोखण्यात आले. आक्रमक कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरची हवा सोडत तीव्र आंदोलन केले. त्यामुळे जिल्ह्यात ऊस दर आंदोलनाची तीव्रता वाढली. शुक्रवारी कारखाने बंद ठेवावेत, ऊसाचे वाहन रस्त्यांवर दिसल्यास पेटवले जाईल, असा इशारा स्वाभिमानीने दिला आहे, त्यामुळे आंदोलनाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.

  यंदाच्या हंगामात गाळपास जाणाऱ्या ऊसाला एकरकमी एफआरपी मिळावी, उत्पादकांची वजनामध्ये होणारी लूट थांबवावी व वाहतूकदारांची सुरू असलेली फसवणूक थांबवावी, साखरेला केंद्र सरकारने पाच रुपयांचा अधिकचा भाव द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी ऊस तोडणी बंद आंदोलनाची हाक देण्यात आली होती. सांगली जिल्ह्यात गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ठिकठिकाणी आली. सुरू असलेली ऊस वाहतूक बंद पाडण्यात आली. वाळवा येथील हुतात्मा सहकारी साखर कारखान्याकडे वाहतूक होणाऱ्या चार बैलगाडीच्या टायरमधील हवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोडली. खानापूर तालुक्यातील उदगिरी साखर कारखान्याकडे ट्रॅक्टरमधून होणारी ऊस वाहतूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखली.

  कडेगाव-पाचवा मैल रस्त्यावर राजेंद्र माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. बावची फाट्यावर भागवत जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. हुतात्मा आणि राजारामबापू करखण्याला जाणाऱ्या वाहनाची हवा सोडण्यात आली. वसगडेत संदीप राजोबा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले तर मिरज तालुक्यात संजय बेले, भरत चौगुले, संजय खोलखुंबे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन करण्यात आले.

  क्रांती कारखान्यावर धडक

  पलूस तालुक्यातील क्रांती साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने धडक दिली. शिवारातील ऊस तोडी बंद केल्या. ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर रोखून गांधीगिरी पद्धतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निदर्शने करत आंदोलन केले. संतप्त शेतकऱ्यांनी साखर कारखान्याच्या गेटवर उसाने भरलेल्या गाड्या अडवून गेट बंद केले. क्रांती कारखान्यांकडे जाणारे दोन ट्रॅक्टर बलवडी येथे वाहने पंक्चर करण्यात आली.

  गावोगावी मोटरसायकल रॅली

  उदगिरी, विराज, क्रांती, सोनहिरा कारखाना कार्यक्षेत्रातील गावोगावी मोटरसायकल रॅली काढत धडक दिली. ज्या ठिकाणी तोडी सुरू होत्या, त्या बंद पाडण्यात आल्या. तर काही तुरळक ऊसाची वाहतूक सुरू होती. त्या वाहनाची हवा सोडण्यात आली. सांगली येथील दत्त इंडियाकडे येणाऱ्या वाहनांची हवा कुमठे परिसरात सोडण्यात आली. याशिवाय उदगीरी, विराज, क्रांती आणि सोन हिरा साखर कारखान्याच्या प्रशासनाला शुक्रवारीही संपूर्ण ऊस तोड आणि ऊस वाहतूक बंद झाली पाहिजे, अशी मागणी केली.

  भडका उडण्याची शक्यता

  एकरकमी एफआरपीसाठी १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी आंदोलन पुकारले होते. त्यामुळे काही ठिकाणी उत्स्फुर्तपणे तोडी बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतू कारखाना असलेल्या जवळच्या गावांमध्ये तोडी सुरुच राहिल्या. त्यामुळे आक्रमक कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरची हवा सोडत तीव्र आंदोलन केले. पहिल्याच दिवशी जिल्ह्यात ऊस दर आंदोलनाची तीव्रता वाढली. शुक्रवारी कारखाने बंद ठेवावेत. रस्त्यांवर ऊसाचे वाहन दिसल्यास ते पेटवले जाईल, असा इशारा दिल्याने जिल्ह्यात आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

  शेतकरी, ऊस वाहतूकदार, मजूर आणि साखर कारखानदारांच्या मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या ऊस तोड बंद, ऊस वाहतूक बंद आंदोलनाला पहिल्या दिवशी उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शंभर टक्के बंद यशस्वी झाला आहे.

  महेश खराडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी