ऊस दराचे आंदोलन चिघळले; आंदोलकांनी रोखली ऊस वाहतुकीची वाहने

ऊस दरासाठी सुरू असलेले शिरोळ तालुक्यातील आंदोलन चिघळले असून, भरलेली ऊस वाहने रोखत असताना आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे व कार्यकर्त्यांना शिरोळ पोलिसांनी ताब्यात घेतले.  त्यामुळे आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, शिरोळ तालुका बंदची हाक दिली आहे.

    शिरोळ : ऊस दरासाठी सुरू असलेले शिरोळ तालुक्यातील आंदोलन चिघळले असून, भरलेली ऊस वाहने रोखत असताना आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे व कार्यकर्त्यांना शिरोळ पोलिसांनी ताब्यात घेतले.  त्यामुळे आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, शिरोळ तालुका बंदची हाक दिली आहे.

    वाहने आडवीत असताना काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते, तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आमच्या उसाचे नुकसान होऊ नये, वाहनातील ऊस साखर कारखान्याकडे गाळपास जावा, अशी भूमिका आंदोलकांच्या समोर घेतल्याने पोलिस संरक्षणात वाहने कारखान्याकडे रवाना करण्यात आली.

    शिरटी फाटा येथे अडविली वाहने

    आंदोलन अंकुशच्या वतीने गेली चार दिवस ‘ऊस दर जाहीर करा, मगच ऊस गाळप करावा’ अशी भूमिका घेत ऊसतोड व ऊस वाहतूक बंद करण्याचे आंदोलन सुरू केले होते. याकरिता सकाळी शिरोळमधील शिरटी फाटा येथे सर्व साखर कारखान्याकडे जाणारी  उसाने भरलेली वाहने रोखून धरली होती.  या ठिकाणी धनाजी चुडमुंगे व आंदोलन अंकुशचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी ठाम भूमिका घेत साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केल्याशिवाय गेल्या वर्षीचा अंतिम हप्ता आरएसएफ फॉर्मुलानुसार मिळावा, मगच ऊस तोडी द्याव्यात अशी मागणी केली.

    वाहने अडविताच पोलिसांचा हस्तक्षेप

    आंदोलनस्थळी उपस्थित असणारे ऊस उत्पादक शेतकरी व वाहन मालकांनी आमचा ऊस वाळत आहे. आमचे नुकसान होत आहे. तसेच वाहनांचे नुकसान होत आहे. त्यामुळे ही भरलेले उसाची वाहने कारखान्याकडे गाळपास जावीत अशी भूमिका आंदोलकांच्या समोर मांडली. आंदोलक वाहने सोडत नसल्याचे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप करत वाहने कारखान्याकडे पाठवण्यास सुरुवात केली. यावेळी आंदोलन वाहनांच्या समोर येत असल्याचे पाहून धनाजी चुडमुंगे व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

    आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

    आंदोलकांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर साखर कारखानदार व भांडवलदारांनी दडपशाही मार्गाने पोलिसांना हाताशी धरून हे आंदोलन मोडीत काढण्याच्या दृष्टीने काही कारण नसताना आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असा आरोप आंदोलन अंकुशच्या पदाधिकाऱ्यांनी  केला. या घटनेचा निषेध करीत त्यांनी शिरोळ तालुका बंदची हाक दिली आहे.

    यावेळी आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष राकेश जगदाळे, भूषण गंगावणे, अमोल गावडे, अक्षय पाटील, कृष्णात देशमुख, आनंदा भातमारे, आप्पासो कदम, शशिकांत काळे, महेश वठारे ,प्रभाकर बंडगर, सागर सावंत, गणेश सावंत, शिवाजी पाटील, बंटी माळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिरोळचे माजी सरपंच शिवाजीराव माने देशमुख, दत्त नागरी पतसंस्थेचे संचालक शिवाजीराव जाधव, अगरचे माजी सरपंच दिलीप चव्हाण, मोहन कांबळे,  प्रकाश कोरे यांनी शेतकरी व वाहन मालकांच्या वतीने भूमिका मांडली.

    आमच्या साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी या वर्षीच्या गाळपास येणाऱ्या उसाला २९०३ रुपये दर जाहीर केला आहे. तसेच इतर साखर कारखान्याच्या तुलनेबरोबर ऊस दर व असणारा फरक देणार असल्याची भूमिका मांडली आहे. यामुळेच कारखाना व्यवस्थापनावर विश्वास ठेवून ऊस उत्पादक शेतकरी गुरुदत्त शुगर्सकडे ऊस गाळपासाठी पाठवत आहेत. तालुक्यात आलेला महापूर, कोरोना काळ परतीच्या पावसाचा फटका यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या खचून गेला आहे. त्यांना दिलासा देण्याकरिता वेळेत ऊस गाळप होणे गरजेचे आहे. यासाठी आंदोलकांनी समन्वयाची भूमिका घेऊन शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्याकरिता भरलेले ऊस वाहने अडवू नयेत. त्यांनी शेतकरी हिताचा विचार करावा.

    - विजय जाधव, शेती अधिकारी, गुरुदत्त शुगर्स.