ऊस दराचा तिढा कायम; चिघळलेल्या आंदाेलनामुळे शेतकरी अडकले अर्थिक अरिष्टात

शेतकऱ्यांचा अर्थकणा असलेल्या ऊस पिकांची खुंटलेली वाढ अशातच शेतकरी संघटना व कारखानदार यांच्यामध्ये चिघळलेल्या ऊसदराच्या प्रश्नामुळे शेतकरी बांधव अर्थिक अरिष्टात सापडला आहे. ऊसदराचा तिढा लवकर सुटावा, अशी मागणी होत आहे.

    हातकणंगले : यंदा पावसाने दिलेली कमालीची ओढ, खरीप हंगामाचा उडालेला बोजवारा त्याचबरोबर शेतकऱ्यांचा अर्थकणा असलेल्या ऊस पिकांची खुंटलेली वाढ अशातच शेतकरी संघटना व कारखानदार यांच्यामध्ये चिघळलेल्या ऊसदराच्या प्रश्नामुळे ‘आधीच मागास त्यात फाल्गुन मास’ अशी अवस्था झाली आहे. परिणामी शेतकरी बांधव अर्थिक अरिष्टात सापडला आहे. ऊसदराचा तिढा लवकर सुटावा, अशी मागणी होत आहे.

    अस्मानी संकटात शेतकरी सापडला असताना हातकणगले व शिरोळ तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ४०० रुपये मागील व यंदाच्या ऊसाकरीता ३५०० हजार एकरकमी मिळण्याकरीता ऊसतोड बंदची हाक देऊन आक्रमक भूमिका घेतला आहे. यामध्ये टायर पेटविणे, वाहनांची तोडफोड, शेतकरी व चालक यांच्यात मारामारी, ऊसाची नासधूस अशा घटनांमध्ये अखेर शेतकऱ्यांचेच नुकसान होत आहे. तसेच तोडणी वाहतूक यंत्रणा बसून राहिल्याने कारखान्यांना तोटा सहन करावा लागत आहे. यातून ऊस पळवापळवी होत असल्याने संघटना व कारखाना व्यवस्थापनामध्ये वादावादीचे प्रकार घडत आहेत. तरी संघटना व कारखान्यांनी तडजोडीतून मार्ग काढून ऊसतोड सुरू करण्याची मागणी ऊस उत्पादक करत आहेत.

    गत गळीत हंगामातील ऊसाला ४०० रुपये हप्ता मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रोश पदयात्रा काढली. खर्डा भाकरी आंदोलन केले. यामध्ये लोकप्रतिनिधीना खर्डा भाकर खावी लागली. या उलट स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलीस कोठडीची हवा खावी लागली. मात्र कारखाना व्यवस्थापन व संघटनांमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही. यावर संघटनेने ऊस तोडू देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला. त्यातून ऊस तोड करून वाहतुकीची पळवापळवी होत आहे. काही ठिकाणी वादाचे प्रसंग घडत आहेत.

    हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील कारखान्यांना ३० ते ४० टक्के ऊस हा कर्नाटक सीमाभागातून येत असतो. कर्नाटकच्या सीमा भागातील साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. त्यांनी ऊसतोड बंदीचा लाभ उठवत सीमा भागातील ऊस तोडीवर भर देऊन मोठ्या प्रमाणावर यंत्रणा लावून ऊसतोड सुरू केली आहे. त्यामुळे भविष्यात हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील कारखान्यांना ऊस मिळणे मुश्किल होणार आहे. त्याचाच मोठा आर्थिक तोटा कारखान्यांना सहन करावा लागणार आहे.

    जिल्ह्यातील अन्य काही कारखाने सुरू झाल्याने त्या तालुक्यातील येणारा ऊस सुद्धा बंद होणार असल्याने त्याचाही मोठा आर्थिक तोटा कारखान्यांना बसणार आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी दोन्ही तालुक्यात पाऊस कमी पडला आहे. विहिरींचे व विंधन विहिरी आताच कोरड्या पडल्या आहेत. शाळू गहू व हरभऱ्याचे उत्पादन घटणार आहे. याशिवाय पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने तालुक्यातील वारणा व पंचगंगा नदीमध्ये कमी पाणी आहे. भविष्यात पिण्यासाठी पाण्यायाची कमतरता जाणवणार या भितीने नवीन ऊस लागण करण्यास मनाई केल्याचे समजते. त्यामुळे या वर्षीच्या पन्नास टक्के ऊस क्षेत्र पुढील हंगामात असणार आहे.

    सध्या कारखानदार, संचालक व नेत्यांच्या बगलबच्यांचे उस तोडून नेले जात आहेत. हातकणंगले, शिरोळ तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला आहे. मात्र अन्य तालुक्यामध्ये संघटनेची संख्या कमी असल्याने जबरदस्तीने ऊस तोडून पाठवत आहेत. त्यामुळे संघटना व कारखानदार यांच्या संघर्षाला धार देताना दिसत आहे.

    हंगाम लांबल्याने ऊस उत्पादनावर परिणाम

    शेतकरी हंगाम लांबल्याने ऊस उत्पादनावरही परिणाम होणार आहे. याशिवाय लाखो रुपये देऊन आणलेली तोडणी वाहतूक यंत्रणा किती दिवस बसवून ठेवायची हा मोठा प्रश्न ट्रॅक्टरचालकाला भेडसावत आहे. एकंदरीत नैसर्गिक संकट , संघटना व कारखानदार यांच्यातील संघर्ष यामुळे शेतकरी मेटाकूटीस आल्याचे चित्र तालूक्यात आहे.

    ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून राजू शेट्टी यांनी संघर्ष केला आहे. म्हणूनच शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत, हे सत्य नाकारून चालणार नाही. त्यामुळे शेट्टी घेतील ती भूमिका योग्यच आहे.

    - सुभाष अकिवाटे, ऊस उत्पादक शेतकरी

    चर्चेतूनच मार्ग काढण्याची गरज

    ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदार यांच्यातील संघर्ष पाहता चर्चेतूनच मार्ग काढला तर कारखानदार व शेतकरी यांच्यात गैरसमज निर्मान होणार नाही. कारखान्याचे मालकही शेतकरीच आहेत. त्यामुळे चर्चेतूनच तोडगा काढल्यास योग्य होईल, असे काही जाणकार शेतकऱ्यांनी मत व्यक्त केले आहे.