सांगलीतील ऊस दराचा तिढा सुटला; शेतकरी संघटना कारखानदारांच्या बैठकीत टनाला ३१७५ रुपये दर जाहीर

अखेर सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सुटला आहे. टनाला ३१७५ रुपये दर देण्याचे मान्य केले आहे. शेतकरी संघटना कारखानदारांच्या बैठकीत हा निर्णय झाला, शेतकरी संघटनेने गेल्या काही दिवसांपासून केलेल्या आंदोलनाला हे यश आले आहे.

  सांगली : अखेर सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सुटला आहे. टनाला ३१७५ रुपये दर देण्याचे मान्य केले आहे. शेतकरी संघटना कारखानदारांच्या बैठकीत हा निर्णय झाला, शेतकरी संघटनेने गेल्या काही दिवसांपासून केलेल्या आंदोलनाला हे यश आले आहे. यावेळी क्रांती कारखान्याचे अध्यक्ष आमदार अरुण लाड, प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलिस प्रमुख बसवराज तेली यांच्यासह इतर कारखान्याचे प्रमुख व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
  राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांची संख्या पश्चिम महाराष्ट्रात आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सुटला होता. साताऱ्यात देखील जिल्हाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या संयुक्त बैठकीत ऊस दराबाबत तोडगा निघाला होता. मात्र, सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा काही सुटत नसल्याचं चित्र होतं.
  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी, जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह शेतकऱ्यांचा ऊस दरासाठी संघर्ष सुरु होता. सांगली जिल्हा प्रशासन, साखर कारखाना प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात बैठकांचं सत्र सुरु होतं पण तोडगा निघत नव्हता. अखेर सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सुटला आहे.
  दोन बैठकीनंतर निघाला तोडगा
  प्रशासन, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. साखर कारखान्यांनी विना कपात ३१७५ रुपये दर देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे ऊस आंदोलनाला यश मिळाले आहे. कोल्हापूर फॉर्मुल्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातही उसाला दर मिळावा या मागणीसाठी गेल्या अनेक महिने आंदोलन सुरू होते. या आंदोलनात स्वतः राजू शेट्टी यांनी सहभागी होऊन काटा बंद आंदोलन सुद्धा केले होते. यानंतर जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी दर जाहीर केला. मात्र उर्वरित साखर कारखान्याचे दर मान्य नसल्याने हे आंदोलन चालूच राहिले होते. यानंतर प्रशासनाने साखर कारखानदार शेतकरी संघटना यांच्यात बैठक बोलावली, दोन बैठकीनंतर हा तोडगा निघाला आहे.
  काटामारी, इथेनॉलची लढाई सुरूच राहणार
  कारखानदारांनी ३१७५ रुपये दर देण्याचं जाहीर केले आहे. तर दुष्काळी पट्ट्यातील साखर कारखान्याने ३१०० दर देण्याचं याआधीच जाहीर केले, त्यामुळे या आंदोलनाला यश मिळाल आहे. साडे बारा टक्के रिकव्हरीच्या वर आहे त्या साखर कारखान्यांनी विना कपात ३१७५ रुपये दर देण्याचे निश्चित केले आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला यश आले आहे. यापुढे उसाची काटामारी, इथेनॉलची लढाई सुरूच राहणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितले आहे.