ऊस वाहतूक शेतकऱ्यांची फसवणूक; मुकादमांकडून लाखोंचा गंडा

कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊसाचे उत्पादन (Sugarcane Production) घेतले जाते. जिल्ह्यातील 21 व अन्य सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना (Sugar Factory) हा ऊस पुरवठा केला जातो. ऊस तोडणीसाठी लागणारी यंत्रणा ही त्याच पट्ट्यातील शेतकऱ्यांनी मजुरांपासून ते वाहतुकीपर्यंतची सर्वच यंत्रणा उभी केली आहे.

    हातकणंगले : कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊसाचे उत्पादन (Sugarcane Production) घेतले जाते. जिल्ह्यातील 21 व अन्य सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना (Sugar Factory) हा ऊस पुरवठा केला जातो. ऊस तोडणीसाठी लागणारी यंत्रणा ही त्याच पट्ट्यातील शेतकऱ्यांनी मजुरांपासून ते वाहतुकीपर्यंतची सर्वच यंत्रणा उभी केली आहे. त्याच माध्यमातून साखर कारखान्यांना ऊस पुरवठा केला जातो. ऊसतोडीसाठी लागणाऱ्या मजुरांची कमतरता असल्यामुळे ऊस तोडीसाठी लागणारे मजूर हे महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही आणले जातात, ही सर्व यंत्रणा त्या-त्या भागातील मुकादम पुरवत असतात.

    गेल्या काही वर्षांपासून अशा मजूर पुरवणाऱ्या मुकादमांकडून ऊस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचे चित्र आहे. यातूनच ऊस वाहतूक करणारे शेतकरी हे कर्जबाजारी झाले आहेत. याबाबत या फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर पोलिस अधिक्षक कोल्हापूर यांच्याकडे दाद मागतली होती. अशी फसवणूक झालेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांनी पुराव्यानिशी पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक कोल्हापूर यांनी केले होते. त्यानुसार, आज हातकणंगले पोलीस ठाणे हद्दीतील साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करणाऱ्या शेकडो ऊस वाहतूकदार फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी हातकणंगले पोलिस ठाणे येथे तक्रार दिली असून, यामध्ये 100 च्या वर शेतकऱ्यांची लाखो रूपयांची फसवणूक झाली.

    दरम्यान, रात्री उशीरापर्यंत ही माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यात विशेष म्हणजे एकाच मुकादमाने अनेक ऊस वाहतूक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये काही परराज्यातील मुकादम व मजुरांचा समावेश आहे. आज हातकणंगले पोलिस ठाणे येथे फसवणूक झालेल्या ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.