“राज्यसभा तो झाकी; विधानपरिषद अभी बाकी है! ” धनंजय महाडीक यांचे सूचक विधान

- कराडात भाजपकडून जंगी स्वागत

  कराड : राज्यातील सत्तांतराचे चित्र सर्व जनतेसमोर आहे. भाजपाकडे संख्याबळ कमी असतानाही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील यांनी तिनही उमेदवारांना निवडून आणले. येणार्‍या २० तारखेला होणारी विधानपरिषदेची निवडणुक गुप्त मतदान पध्दतीने होणार असून राज्यसभा तो झाकी है; विधानपरिषद अभी बाकी है येथेही निश्चितच करिश्मा पहायला मिळणार असल्याचा असा सूचक विधान भाजपचे नवनिर्वाचित खा. धनंजय महाडीक यांनी दिला.

  नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खा. धनंजय महाडीक कराड येथे भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यवतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, मुकूंद चरेगावकर, माजी नगरसेवक घनशाम पेंढारकर, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, प्रमोद शिंदे, किरण मुळे, रमेश मोहिते, समाधान चव्हाण, महेश भोसले, यशवंत फुटाणे उपस्थित होते.

  खा. महाडीक म्हणाले, महाआघाडी सरकारकडून१७४ आमदारांचे संख्याबळ असल्याचे घोषित करण्यात आले. त्या जोरावरच प्रारंभी बिनविरोधचा प्रस्ताव महाआघाडीकडून नाकारण्यात आला. त्यामुळे तब्बल २५ वर्षाची राज्यसभा निवडणुकीची बिनविरोधची परंपरा मोडित काढत महाआघाडीनेच खऱ्या अर्थाने ही निवडणुक लादली आहे.

  ते म्हणाले, मी सर्व आमदारांचे आभार मानतो. अपक्षांचे मतदान गुप्त होते. त्यामुळे सर्वांचाच सन्मान झाला पाहिजे. भाजपाचे आ. लक्ष्मणभाऊ जगताप, मुक्ताताई टिळक यांची प्रकृती ठिक नसतानाही त्यांनी रुग्णवाहिकेतून येऊन मतदान केले. त्यामुळे त्यांचे मी प्रथम आभार मानले. या निवडणुकीत एक-एक आमदारांचे मत महत्वाचे होते. आमच्याकडे १३ ते १४ मते कमी होती. मात्र, विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या कौशल्याने ही गोळाबेरीज करून भाजपाचे तीनही उमेदवार निवडून आणले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचे विधान केले. यासह त्यांनी केलेली अन्य वक्तव्ये पूर्णपणे चुकीची आहेत. अपक्ष आमदार व घटक पक्षांच्या आमदारांवरही त्यांनी आरोप केले. त्यांच्याकडून मिळालेल्या वागणुकीमुळे आमदार त्रस्त झाले आहेत. यामुळेच महाविकास आघाडीच्या पदरी अपयश आले.

  येत्या काळात कोल्हापुरचे चित्र बदललेले दिसेल
  भारतीय जनता पक्षाच्यावतीने मला राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. हा खरतर महाडीक परीवारासह कोल्हापुरकरांचाही गौरव आहे. माझ्या विजयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणे निश्‍चितच बदलली आहेत. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थामध्ये भाजपाची सत्ता आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार असून येत्या काळात कोल्हापुरमधील चित्र नक्कीच बदलल्याचे दिसेल, असा विश्वासही खा. महाडीक यांनी यावेळी व्यक्त केला.