साखर संघाच्या संचालकपदी सुहासिनीदेवी घाटगे यांची बिनविरोध निवड

राज्याच्या साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि. मुंबई या संस्थेच्या संचालकपदी शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांची बिनविरोध निवड झाली.

    कागल : राज्याच्या साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि. मुंबई या संस्थेच्या संचालकपदी शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांची बिनविरोध निवड झाली.

    राज्य सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये महिला राखीव मतदार संघातून घाटगे यांची बिनविरोध निवड झाली. सुहासिनीदेवी घाटगे या सध्या स्व. राजे विक्रमसिंह घाटगे संस्थापक असलेल्या व सहकारी साखर कारखानदारीमध्ये आदर्श असलेल्या शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.

    स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी देखील काही काळ राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्षपद भूषविले होते. अत्यंत मानाच्या अशा या शिखर संस्थेवर घाटगे यांची निवड झाल्याने शाहू ग्रुपच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या निवडीची बातमी समजताच शाहू उद्योग समूहात आनंदाचे वातावरण पसरले असून फटाके वाजवून या निवडीचे स्वागत सभासद व कर्मचाऱ्यांनी केले.