‘लालबागच्या राजाला अखेरचा नमस्कार’; कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची सुसाईड नोट, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि धनुष्यबाणानं मृत्यूचं गूढ वाढलं?

नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी गळफास घेतलेल्या ठिकाणी जमिनीवरच दोरीच्या साहाय्यानं एक धनुष्यबाणाचं चिन्ह बनवलं होतं, असं म्हटलं जात आहे. त्यामुळं याचा नेमका अर्थ काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

    मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये (ND Studio) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. एनडी स्टुडिओमधील काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत नितीन देसाई दिसून आले. पण आता त्यांनी आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लिपची सध्या चर्चा सुरू झाली आहे.

    नितीन देसाई मंगळवारी मध्यरात्री दिल्लीहून मुंबई विमानतळावर पोहोचले. तेथून कार घेऊन ते अडीच वाजता कर्जत येथील एनडी स्टुडिओत पोहोचले. यानंतर त्यांनी मॅनेजरशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी मॅनेजरला सकाळी व्हॉईस रेकॉर्डर देतो, असे सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार मॅनेजर त्यांच्याकडे व्हाईस रेकॉर्डर घेण्यासाठी सकाळी गेला. हा रेकॉर्डर मिळाल्यानंतर त्याने पोलिसांना दिला. या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये एकूण 11 ऑडिओ क्लीप्स असल्याची माहिती समोर आली आहे.

    ‘लालबागच्या राजाला अखेरचा नमस्कार’

    या ऑडिओ क्लीप्समधील महत्त्वाचा तपशीलही उघड झाला आहे. यापैकी एका ऑडिओ क्लीपमध्ये नितीन देसाई यांनी ‘लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार’ असे म्हटले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नितीन देसाई हे लालबागच्या राजाच्या सजावटीचे काम करत होते. मात्र, यंदा नितीन देसाई यांनी जगाचा निरोप घेतल्याने हे काम अपूर्ण राहिले आहे.

    आत्महत्या करण्यापूर्वी काढलं धनुष्यबाण

    नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी गळफास घेतलेल्या ठिकाणी जमिनीवरच दोरीच्या साहाय्यानं एक धनुष्यबाणाचं चिन्ह बनवलं होतं, असं म्हटलं जात आहे. त्यामुळं याचा नेमका अर्थ काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

    एन.डी. स्टुडिओतच होणार अंत्यसंस्कार

    देसाई यांचे पार्थिव पोस्टमॉर्टमसाठी जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तिथे पाच तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यांचा मोबाईल, व्हॉईस रेकॉर्डर याचीही फॉरेन्सिक तज्ञांची टीम तपासणी करणार आहे. देसाई यांचा मुलगा अमेरिकेत असतो. तो मुंबईत आल्यानंतर देसाई कुटुंबीयांच्या सांगण्यानुसार देसाई यांच्या पार्थिवावर एन.डी. स्टुडिओतच शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.