जळगाव तालुक्यातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

जळगाव तालुक्यातील बोरनार येथे एका 16 वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरात छताला गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. या तरूणीने आत्महत्या का केली याचे कारण समोर आलेले नाही.

    जळगाव : जळगाव तालुक्यातील बोरनार येथे एका 16 वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरात छताला गळफास घेत आत्महत्या (Suicide of Young Girl) केली. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. या तरूणीने आत्महत्या का केली याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

    मानसी नरेंद्र देशमुख (वय १६, रा. बोरनार ता. जळगाव) असे या तरुण विद्यार्थिनीचे नाव आहे. जळगाव तालुक्यातील बोरनार येथे मानसी ही मुलगी आपल्या आई-वडील, भाऊ, यांच्यासह राहत होती. तिचे आई-वडील शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करत आहेत. तर मानसी हिने नुकतीच इयत्ता दहावीची परीक्षा दिलेली होती. मानसीचे काका रत्नाकर देशमुख सैन्यदलात आहे. रविवारी मानसीने सकाळी उठल्यावर सर्व घरकाम केले. त्यानंतर घरात सदस्य असताना मानसीने दुसऱ्या खोलीत जाऊन छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली.

    दरम्यान, कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी एकच आक्रोश केला. नातेवाईकांसह शेजारांच्या मदतीने मानसी हिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी तपासून तिला मयत घोषित केले. यावेळी देशमुख कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला. मानसी देशमुख हिने आत्महत्या का केली ? त्यामागील कारण समजून आलेले नाही. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.