‘जजसाहेब माझा हा शेवटचा जबाब…’, पोलिसांनी माझ्याकडून पैसे घेतले अन् गुन्हाही दाखल केला

    अकोला- ‘मी गुन्हेगार नव्हतो. किराणा दुकान चालवतो. माझ्याकडून पोलिसांना चार गुटख्याचे पाकिट घेतले आणि गुन्हा दाखल करत नाही, असे म्हणून एक लाख रूपये घेतले. त्यानंतर वरून दबाव आहे असे म्हणत गुन्हाही दाखल केला व माझ्याकडून दरमहा लाच स्वरुपात हप्ता घेतला. आता पोलिसांनी मला अडकवले आहे. म्हणून जजसाहेब हे माझे शेवटचा जबाब आहे. मी आत्महत्या करीत आहे, असे न्यायाधीशांना उद्देशून ३५ वर्षीय युवकाने आत्महत्या केली.’

    या घटनेने अकोल्यात खळबळ उडाली असून आत्महत्येपूर्वी तरुणाने पोलिसांवर आरोप केले आणि त्यांच्या अन्यायाचा पाढाही वाचला. या प्रकरणी तूर्त पोलिसांनी कुणावर गुन्हा दाखल केला नाही. मात्र संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे चौकशी सोपवली आहे.

    अकोला जिल्ह्यातील उगवा गावात दोन तरुणांनी २३ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. आता या प्रकरणाची वेगळेची वस्तुस्थिती समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या आशिष गोपीचंद अडचुले (वय ३५ वर्ष, रा. उगवा.) याचे दोन-तीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये त्याने अकोट फैल पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. येथील पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख रुपयांसह हप्ते घेतले आहेत. असा आरोप करत या सर्व पोलिसांना आत्महत्येसाठी जबाबदार धरले आहे.