कुर्डुवाडी येथील पशुधन विकास अधिकाऱ्याची आत्महत्या; कार्यालयातच गळफास घेऊन संपवलं जीवन

पशुधन विकास अधिकाऱ्याने आत्महत्या केली. कुर्डुवाडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये कर्तव्यावर असताना कार्यालयातील छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवलं. ही घटना बुधवारी (दि.१०) घडली.

    कुर्डुवाडी : येथील पशुधन विकास अधिकाऱ्याने आत्महत्या केली. कुर्डुवाडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये कर्तव्यावर असताना कार्यालयातील छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवलं. ही घटना बुधवारी (दि.१०) घडली. विश्वनाथ चिमाजी जगाडे (वय ३९, मूळ रा. परभणी, सध्या कुर्डुवाडी ता.माढा) असे गळफास घेतलेल्या पशुधन विकास अधिकाऱ्याचे नाव आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पशुधन विकास अधिकारी विश्वनाथ जगाडे हे मूळचे परभणी येथील असून, कुर्डुवाडी येथे गेल्या दोन वर्षांपासून पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. बुधवारी (दि.१०) त्यांनी कार्यरत असलेल्या पशू वैद्यकीय दवाखान्यात कार्यालयातील छताच्या लाकडी वाश्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती सायंकाळी मिळताच परिसरातील शासकीय व खासगी पशूवैद्यांनी येथील ग्रामीण रूग्णालयात गर्दी केली होती.

    आत्महत्येबाबत मात्र नेमके कारण समजू शकले नसले तरी त्यांना शासकीय कामाचा अधिक ताण होता, अशी चर्चा पशू वैद्यकीय विभागात दबक्या आवाजात सुरु होती. गुरूवारी सकाळी सोलापुर जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ. नवनाथ नरळे यांनी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले.

    कुर्डुवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करुन सदर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.