माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्यांकडून सातत्याने छळ; अखेर विवाहितेची दोन मुलांसह आत्महत्या

माहेरुन पैसे आणण्यासाठी होणाऱ्या शारीरिक व मानसिक जाचाला कंटाळून विवाहितेने (Suicide of Married Woman) आपल्या दोन मुलांसह शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे घडली.

    वणी : माहेरुन पैसे आणण्यासाठी होणाऱ्या शारीरिक व मानसिक जाचाला कंटाळून विवाहितेने (Suicide of Married Woman) आपल्या दोन मुलांसह शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे घडली. दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    अश्विनी पूरकर (रा. धोंडगव्हाण वाडी, ता. चांदवड) यांचा विवाह अर्जुन सुदाम मुळाणे (रा. खतवड, ता. दिंडोरी) यांच्याबरोबर १६ मे २०१२ रोजी झाला. उभयताच्या लग्नानंतर तीन वर्षे सासरच्यांनी अश्विनीला व्यवस्थित नांदवले. त्यानंतर माहेरुन पैसे आणण्यासाठी तिच्यावर सासरच्यांनी दबाव तंत्राचा वापर केला.

    याबाबत तिने माहेरच्यांना ही माहिती दिली. मात्र, त्रास सुरुच राहिल्याने अखेर अश्विनीच्या वडिलांनी पैसे देण्याचे कबूल केले. मुलीला त्रास देऊ नका, असे सांगितले. 2018 मध्ये अश्विनीला सासू, नवरा व दीर यांनी शिवीगाळ व मारहाण केली. याबाबत अश्विनीने माहेरच्यांना ही माहिती दिली. पण नंतरही काही न झाल्याने अखेर तिने आत्महत्या केली. दरम्यान, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.