चंद्रपुरात उन्हाळ्याचा नागरिकांना फटका; पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन

चंद्रपूरमध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. याच्या निषेधार्थ चंद्रपुरातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे.

    चंद्रपूर : यंदा राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे यंदा पाण्याची चणचण देखील भासू लागली आहे. काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला असला तरी चंद्रपूरमध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. याच्या निषेधार्थ चंद्रपुरातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे.

    चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात अमृत योजनेचे काम सुरू केले होते. मात्र कामाचा अवधी पूर्ण झाल्यावर सुद्धा आजही अनेक भागात अमृतची पाईपलाईन पोहचलेली नाही.  ज्या भागात पाईपलाईन गेली त्या भागात पाणी आलेले नाही. अशी दयनीय अवस्था चंद्रपूरमध्ये निर्माण झाली आहे. मात्र याविरोधात भाजपचे नेते सुभाष कासनगोट्टूवार यांनी आवाज उठवीत रस्ता रोको आंदोलन केले.

    चंद्रपूर येथील रस्ता रोको तीव्र आंदोलनानंतर येत्या 10 दिवसांत सुमित्रा नगर वस्तीमध्ये अमृतचे पाणी येईल असे आश्वासन आंदोलनकर्त्याना देण्यात आले आहे. 5 वर्षांपूर्वी मनपाने अमृत योजनेच्या कामाला प्रारंभ केला, त्यानंतर 3 मे 2021 मध्ये तुकूम प्रभागातील सुमित्रा नगर भागात अमृत पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात आले.  मात्र 3 वर्षाच्या कालावधीत सुमित्रा नगर येथील अमृतच्या पाईपलाईन मध्ये पाण्याचा थेंब आला नाही.  पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी याबाबत माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्याकडे तक्रारी केल्या. याबाबत त्यांनी मनपाला वेळोवेळी निवेदने दिली. मात्र, निवेदनावर काहीही कारवाई होत नसल्याने 15 मे रोजी सुमित्रा नगर भागातील नागरिकांना सोबत घेत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

    यावेळी मनपाचे अधिकारी आंदोलनस्थळी पोहचले. त्यांनी आंदोलनकर्त्यांना येत्या 10 दिवसात आपल्या भागांत नियमित पाण्याचा पुरवठा सुरू होणार असे आश्वासन दिले. यावेळी प्रशासनाला 10 दिवसांत जर पाणी या भागात आले नाही तर आम्ही सर्व नागरिक मनपा कार्यालयात पोहचत मनपाला कुलूप ठोकल्याशिवाय राहणार नाही इशारा देण्यात आला. आंदोलनानंतर सुमित्रा नगर भागतील आंदोलनकर्ते नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली. आंदोलनादरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.